जिल्हाधिकार्‍यांच्या गायीच्या दिमतीला चक्‍क सात डॉक्टर! | पुढारी

जिल्हाधिकार्‍यांच्या गायीच्या दिमतीला चक्‍क सात डॉक्टर!

लखनौ : वृत्तसंस्था

उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आपल्या अधिकाराचा कसा वापर करतील आणि आपल्या खालील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा कसा वापर करतील हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना, उत्तर प्रदेशातील फतेहपूरच्या जिल्हाधिकारी अपूर्वा दुबे यांनी गायीच्या उपचारासाठी चक्‍क सात डॉक्टरांची नियुक्‍ती केली आहे.
आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी हे सात डॉक्टर गायीची देखरेख करणार आहेत. प्रत्येक डॉक्टरांना त्या दिवशीचा गायीच्या आरोग्याचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना द्यावा लागणार आहे. याबाबतचा एक सरकारी आदेशच जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी काढला आहे. ज्या गायीच्या प्रकृतीवरून पशुसंवर्धन अधिकारी चिंतित आहेत ती गाय खुद्द जिल्हाधिकारी अपूर्वा दुबे यांनी पाळली आहे.
दुबे यांच्याकडे तीन गायी आहेत. त्यातील एका गायीची प्रकृती बिघडली आहे. या सर्व गायी सरकारी निवासस्थानी आहेत हे विशेष! अपूर्वा दुबे यांचे पती कानपूरचे जिल्हाधिकारी आहेत. डॉक्टरांनी आपल्या कामात हयगय केल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. या सात डॉक्टरांशिवाय एका पशुवैद्यकीय अधिकार्‍यालाही तत्काळ सेवेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

आदेश सोशल मीडियावर व्हायरल

गायीची देखरेख करण्याच्या आदेशाचे पत्र केवळ ऑफिशियल ग्रुपवर शेअर करण्यात आले होते; मात्र यातील एका कर्मचार्‍याने खोडसाळपणे हे पत्र अन्यत्र व्हायरल केले असल्याचे पशुचिकित्सा विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून जिल्हाधिकारी मॅडमच्या गायीच्या नशिबाला सर्वजण दाद देत आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button