राष्ट्रपती रामनाथ कोविंद : लस घ्या, कोरोना अद्याप गेलेला नाही | पुढारी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद : लस घ्या, कोरोना अद्याप गेलेला नाही

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वेळीच लस घ्यावी, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान केले. सर्व प्रकारचे अडथळे असताना सुद्धा ग्रामीण आणि त्यातही कृषी क्षेत्राचा वेगाने विकास होत असल्याची टिप्पणी कोविंद यांनी यावेळी केली.

देश आणि विदेशात राहत असलेल्या कोट्यवधी भारतीयांना राष्ट्रपतींनी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा होत असल्याने यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी सकाळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्यात येईल.

देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, अनेक ज्ञात आणि अज्ञात पिढ्यांतील स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षातून आपले स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहे. या स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग आणि बलिदानाचे उत्तुंग उदाहरण सादर केले आहे. या सर्व अमर सैनिकांच्या पावन स्मृतीला मी श्रद्धापूर्वक नमन करतो. आपली लोकशाही संसदीय प्रणालीवर आधारित आहे. संसद हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. लोकशाहीचे हे मंदिर लवकरच एका नव्या इमारतीत स्थापित होत आहे, ही निश्चितपणे गर्वाची बाब आहे.

हुशार मुलींना त्यांच्या माता-पित्यांनी चांगले शिक्षण द्यावे. त्यांना आयुष्यात पुढे येण्यासाठी संधी प्राप्त करून द्यावी, असा आपला आग्रह असल्याचे सांगून कोविंद पुढे म्हणाले की, सर्व कोविड योद्धयांचे मी मनापासून कौतुक करतो. कोरोनाविरुद्धची लढाई लढत असताना असंख्य योध्याना आपले प्राण गमवावे लागले. त्या सर्वांच्या स्मृतींना प्रणाम करतो. कोरोनाचे संकट गेलेले नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रोटोकॉलनुसार लवकरात लवकर लस घ्यावी. शिवाय दुसऱ्यांना लस घेण्यासाठीही प्रेरित करावे. सर्व प्रकारचा असूनही आपल्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व इतर कोरोना योद्धयांमुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणता आले आहे.

सरकारने यावेळच्या विशेष वर्षाला स्मरणीय बनविण्यासाठी कित्येक योजनांची सुरुवात केली आहे. त्यातील ‘गगनयान मिशन’ ही विशेष महत्वाची योजना आहे, असे कोविंद यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाने केवळ पॅरिस जलवायू कराराचे पालनच केले आहे असे नाही तर जलवायूच्या रक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रतिबद्धतेपेक्षा जास्त योगदान देत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये नव-जागृती दिसून येत आहे. केंद्र सरकारने लोकशाही आणि कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांसोबत चर्चेला सुरुवात केली आहे. ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ च्या रँकिंगमध्ये जेव्हा सुधारणा होते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम देशवासियांच्या ‘ईज ऑफ लिविंग’ वरही होतो.

सर्व प्रकारचे अडथळे असूनही ग्रामीण आणि त्यातही कृषी क्षेत्राचा विकास होत आहे, अशी टिप्पणी कोविंद यांनी केली. आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी 23 हजार 220 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, ही निश्चितपणे समाधानकारक बाब आहे. अलीकडेच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करून देशाचा गौरव वाढविला आहे, असेही राष्ट्रपती कोविंद यांनी नमूद केले.

Back to top button