Vijay Mallya: अखेर किंगफिशर हाउसचा ५२ कोटींना लिलाव | पुढारी

Vijay Mallya: अखेर किंगफिशर हाउसचा ५२ कोटींना लिलाव

मुंबई ; पुढारी ऑनलाईन :  भारतातील बँकांचे ९ हजार कोटींहून अधिक कर्ज बुडविणारा फरार उद्‍योजक विजय मल्‍ल्‍या (Vijay Mallya) याच्‍या मुंबईतील किंगफिशर एअरलाइन्‍सचे मुख्‍यालय किंगफिशर हाउसचा लिलाव झाला.  हैदराबाद येथील एका खासगी विकसक कंपनी सॅटर्न रिअल्‍टर्सने ५२ कोटींना किंकफिशर हाउस खरेदी केले आहे.

सांताक्रूझजवळ असलेली या इमारतीची बाजारभावानुसार किंमत १५० कोटी इतकी आहे. पाच वर्षांपूर्वी या इमारतीचा पहिल्‍यांदा लिलाव ठेवण्‍यात आला होता. त्‍यावेळी १३५ कोटी रुपये किंमत ठेवण्‍यात आली. मात्र एवढी किंमत देण्‍यास कोणताही खरेददार पुढे आला नाही. यानंतर आठवेळा लिलावासाठी प्रयत्‍न झाले. मात्र इमारतीची विक्री झाली नाही.

२०१९मध्‍ये झालेल्‍या लिलावावेळी या इमारतीची किंमत ५४ कोटी रुपये ठेवली होती. तरीही इमारतीची खरेदी झाली नाही. अखेर मार्च महिन्‍यात किंगफिशर हाउस विक्रीसाठी नववा लिलाव झाला.

सॅटर्न सिअल्‍टर्सने ५२ लाखांची बोली लावली होती. ५२. २५ कोटींना इमारतीची विक्री झाली. ही संपूर्ण प्रक्रिया कर्ज वसुली लवादाने पार पाडली. या विक्रीतून आलेले पैसे कर्जदार बँकांना देण्‍यात येणार आहेत. यापूर्वी विजय मल्‍ल्‍या याच्‍या नावावर असलेले ७ हजार २५० कोटी रुपयांच्‍या शेअर्सची विक्री करण्‍यात आली आहे.

लंडन हायकोर्टाचा विजय मल्‍ल्‍या केले होते दिवाळखोर घोषित

भारतातील बँकांचे ९ हजार कोटींहून अधिक कर्ज बुडविणारा फरार उद्‍योजक विजय मल्‍ल्‍या याला लंडन हायकोर्टाने २६ जुलै रोजी दिवाळखोर जाहीर केले आहे. या निर्णयामुळे कर्जथकितप्रकरणी त्‍याची संपत्ती जप्‍त करण्‍याचा मार्ग आता मोकळा झाला होता.

मल्‍ल्‍या याला दिवाळखोर घोषित करावी, अशी मागणी असणारी याचिका भारतीय स्‍टेट बँकेच्‍या नेतृत्‍वाखाली लंडन हायकोर्टात दाखल करण्‍यात आली होती. ९ हजार कोटींहून अधिक कर्जबुडविणार्‍या मल्‍ल्‍यास दिवाळखोर जाहीर करावे, अशी मागणी या याचिकेतून करण्‍यात आली होती.

हेही वाचलं का?

 

Back to top button