श्रीनगर : पुढारी आॅनलाईन डेस्क
काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर गुरुवारी अनेक हिंदू आणि काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील अनेकांनी जम्मूत स्थलांतर केले आहे.
गुरुवारी मुळचे राजस्थानी असलेल्या एका बँक कर्मचाऱ्याची आणि एका बिहारी कर्मचाऱ्याची काश्मिरीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर काश्मीरमधील 30 ते 40 कुटुंबांनी काश्मीर सोडले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
तेथील सरकारी कर्मचारी अमित कौल यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे. "आताचा काश्मीर हा 1990 पेक्षा धोकादायक आहे. आम्हाला आमच्या कॉलनीमध्ये का कोंडून ठेवले आहे. प्रशासन आपले अपयश झाकत आहेत," अशी प्रतिक्रिया तेथील एका हिंदूने दिली आहे.
अशू नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, "येथे सुरक्षा कर्मचाराही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत सामान्य नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करायची? अनेक कुटुंब श्रीनगर सोडत आहेत. काश्मिरी पंडितांचे जे कँप आहेत, ते सील करण्यात आले आहेत."
काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय टिक्कू यांनी एएनआयच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, अशी बामती हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. जवळपास 65 कुटुंबांनी काश्मीर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कुलमागमध्ये संजय कुमार यांच्या हत्येनंतर अनेक कुटुंबांनी काश्मीर सोडायला सुरू केले आहे. जे काश्मिरी पंडित काश्मीर सोडत आहेत, त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी टिकू यांनी केली आहे.
काश्मिरी पंडित पॅकेज योजनेतील कर्मचाऱ्यांनी अनंतनाग येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
तर नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्यांनी काश्मिरी पंडितांचे काश्मीर सोडणे दुःखदायक असल्याचं म्हटले आहे. "काश्मीर हे त्यांचे घर आहे आणि आपण त्यांना सुरक्षित ठेवले पाहिजे. पोकळ शब्दांपेक्षा सुरक्षेची त्यांना गरज आहे. 1990 मध्ये जशी स्थितीही तशीच स्थिती आता निर्माण झाली आहे. याला भाजप सरकार जबाबदार आहे."