हिमाचल प्रदेश : दरड कोसळून ११ जण ठार, ३० बेपत्ता | पुढारी

हिमाचल प्रदेश : दरड कोसळून ११ जण ठार, ३० बेपत्ता

किन्नूर : पुढारी ऑनलाईन

हिमाचल प्रदेश मधील किनौर येथे घाटातील गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास ११ जण ठार झाले आहेत. तर ३० जण अजून बेपत्ता आहेत. अनेक गाड्या दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या हिमाचल प्रदेश मध्ये कोसळलेल्या दरडीखाली एक ट्रक, सरकारी बस आणि अजून काही वाहने दबली गेली आहेत. शिमल्याच्या दिशेने जात असलेल्या बसमध्ये ४० लोक होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास २५ ते ३० लोक दरडीखाली सापडले आहेत. तर १० लोकांना दरडीखालून बाहेर काढत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बचाव कार्यात अडथळे

दरम्यान, इंडो – तिबेटीयन सीमा पोलीस दलाचे ( आयटीबीपी ) २०० जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे यांनी सांगितले की, आमचे बचाव कार्य रात्रीपर्यंत सुरु राहील. सध्या हा भाग फारच धोकादायक झाला आहे.’

एनडीआरएफच्या टीमला केले पाचारण 

हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, एनडीआरएफ टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एक बस आणि खासगी गाडीवर दरड कोसळली आहे. आम्ही सविस्तर माहितीच्या प्रतिक्षेत आहोत.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री ठाकूर यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी सरकारला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या हिमाचल प्रदेश मधील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. तेव्हापासूनच दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

महिन्याभरात दरड कोसळण्याच्या अनेक घटना

गेल्या महिन्यात किनौर भागातच कारवर दरड कोसळून ९ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या व्हिडिओत दिसते की मोठे दगड डोंगर उतारावरुन वेगाने खाली येत होते. त्यातील एक दगड पूलावर आदळला आणि पूल तुटून पडला.

हिमाचल प्रदेशमधील यंदाच्या पावसातील दरड कोसळण्याचे आणि ढगफुटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : खारघर, धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका

Back to top button