बाप तो बापच... लेकाच्‍या औषधांसाठी चालवली तब्‍बल ३०० किलोमीटर सायकल   | पुढारी

बाप तो बापच... लेकाच्‍या औषधांसाठी चालवली तब्‍बल ३०० किलोमीटर सायकल  

बेंगळूर; पुढारी ऑनलाईन:   पायाला जखमा झाल्‍या… कमरेमधूनही जीवघेण्‍या वेदना सुरु  होत्‍या… तरीही सलग तीन दिवस ते सायकल चालवत राहिले. तब्‍बल ३०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरुन पूर्ण करुन त्‍यांना आपल्‍या मुलासाठी औषध आणलेच. मुलावर असणारे उत्‍कट प्रेमातूनच मोठ्या संकटावर मात करत एका बापाने केलेल्‍या अविश्‍वसनीय कामगिरीची चर्चा कर्नाटकमधील कोप्‍पलू गावासह परिसरात सध्‍या होत आहे. 

अधिक वाचा:  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

कोरोना प्रतिबंधासाठी संपूर्ण कर्नाटकमध्‍ये लॉकडाउन जाहीर करण्‍यात आला आहे.  म्‍हैसूरमधील नरसीपूर तालुक्‍यातील कोप्‍पलू गावात ४५ वर्षीय रोजंदारी कामगार आनंद आपल्‍या कुटुंबीयांसमवेत राहतात. त्‍यांचा मुलगा गतिमंद आहे. सलग १८ वर्ष नियमित औषधे दिली तर तो सामान्‍य मुलांसारखे आयुष्‍य जगू शकेल, असे आनंद यांना डॉक्‍टरांनी सांगितले होते. तेव्‍हापासून ते आपल्‍या मुलाला नियमित औषधे देत होते. 

लॉकडाउनच्‍या काळातच औषधे संपली. त्‍यांनी तालुक्‍याच्‍या ठिकाणी चौकशी केली; पण येथे औषधे मिळाली नाहीत.  खासगी वाहनाने बेंगळूरला जाण्‍या इतपत पैसेही त्‍यांच्‍याकडे नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांनी आपल्‍या गावापासून बेंगळूरचा ३०० किलोमीटरचा प्रवास सायकलने करण्‍याचे ठरवले. 

अधिक वाचा:  फायझर, मॉडर्नाची लस लवकरच भारतात, स्‍वतंत्र चाचणी नाही 

प्रवास सुरु झाला. सायकलवरुन औषध आणण्‍यासाठी त्‍यांना तीन दिवस लागले. या तीन दिवसात पायाला जखमा झाल्‍या, कमरेमधूनही जीवघेण्‍या वेदना सुरु होत्‍या. पण, मुलाला वेळेत औषध देण्‍याच्‍या ध्‍यासातून त्‍यांनी यासर्व वेदना सहन केल्‍या. माझा मुलगा गतिमंद आहे. त्‍याला सलग १८ वर्षांपपर्यंत औषधे दिली तर तो सामान्‍य मुलांसारखा होईल, असे मला डॉक्‍टरांनी सांगितले होते. मुलाचा औषधाचा खुराक चुकू नये म्‍हणून मी सर्व धडपड केली, असेही आनंद सांगतात. मुलांसाठी त्‍यांनी केलेल्‍या कामगिरीमुळे ‘बाप असावा तर असा’, असेही कौतुकही आता त्‍यांच्‍या वाट्याला येत आहे. 

 

Back to top button