मराठा आरक्षणप्रश्‍नी फेरविचार याचिका त्वरित दाखल करा | पुढारी

मराठा आरक्षणप्रश्‍नी फेरविचार याचिका त्वरित दाखल करा

पुणे : मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. छत्रपती संभाजीराजे यांना टीकेचे लक्ष्य करीत खासदार नारायण राणे यांनी तिघांवरही पुण्यातील पत्रकार परिषदेत बोचरी टीका केली. मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका त्वरित दाखल करणे हाच आता मार्ग आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.संभाजीराजे जिल्ह्यात येउनही भेटले नसल्याची टीका त्यांनी केली.

पुणे येथे गुरुवारी नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत, मराठा आरक्षणावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शरद पवार राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी आर्थिक निकषावर का आरक्षण दिले नाही. त्यांच्या पुढाकाराने हे सरकार सत्तेत आले आहे, मग सरकारला तशा सूचना त्यांनी द्याव्यात. आता तरी समाजाच्या मागे शरद पवार यांनी उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

102 व्या घटनादुरुस्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज मागास असल्याचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती द्याव्यात, त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज मराठा समाजाला द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करेपर्यंत मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती, त्यांना सरकारी नोकरीत तातडीने नियुक्‍ती द्यावी, अशी मागणीही राणे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांवर टीका

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. ते म्हणाले, मी शिवसेना पक्षात तब्बल 39 वर्षे होतो. उद्धव ठाकरे यांचा सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध होता. त्यामुळे त्यांच्याकडून समाजाने फार अपेक्षा ठेवू नयेत. 

नेतृत्वासाठी धमक लागते

स्वतःच्याच पक्षातील खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही राणे यांनी शरसंधान केले. ते म्हणाले, सध्या संभाजीराजे हे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात दौरा करीत आहेत. दौरा केल्याने समाजाचे प्रश्‍न सुटत नसतात. नेतृत्वासाठी धमक असावी लागते. समाजाची कामेही करावी लागतात. आता त्यांची खासदारकी संपत आली आहे म्हणून ते राजीनामा देण्याची भाषा बोलत आहेत. 

पटोलेंना दिला इशारा

पंतप्रधान हे एका पक्षाचे नाहीत, तर ते भारताचे आहेत. त्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे. मोदी यांच्या स्वभावात रडणे नाही, तर लढणे आहे. पटोले यांनी स्वत:ची क्षमता, पात्रता ओळखून बोलावे. परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

या कलमांच्या आधारे आरक्षण देता येईल

राणे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच आरक्षण गेले आहे. न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा उपाय राज्य सरकारच्या हातात असून, त्वरित याचिका दाखल करावी. 15/4, 16/4 या कलमांतर्गत राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळे त्या कलमांच्या आधारे सरकारला आरक्षण देता येते. तामिळनाडू सरकार 69 टक्क्यांपर्यंत आरक्षण आजही देत आहे. इतर राज्यांतही आरक्षण दिले जाते, मग महाराष्ट्रातच का नाही, असा प्रश्?नही त्यांनी उपस्थित केला.

 

Back to top button