कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर | पुढारी

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका टळलेला नसला तरी ती आता ओसरत आहे. बरे होणार्‍या रुग्णांची दैनंदिन संख्या नव्या बाधितांपेक्षा जास्तच आहे. मृत्यू दरातही घट होत असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी  शनिवारी सांगितले.

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने उग्र रूप दाखविले. रोजच्या बाधितांची संख्या 4 लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र आता ती लाट ओसरत आहे. बाधितांची संख्या 4 लाखांवरून सव्वा लाखांपर्यंत खाली आली आहे. हे चित्र दिलासा देणारे असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. लाट ओसरत असली तरीही काळजी घेण्याची आणि कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे कसोशीने पालन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 20 हजार 529 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता 15 लाख 55 हजार 248 वर पोहोचली आहे. याच कालावधीत 1 लाख 97 हजार 894 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजअखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 कोटी 67 लाख 95 हजार 549 वर पोहोचली आहे.

देशातला रुग्ण बरे होण्याचा दरही आता 93.38 टक्के झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी ही माहिती दिली. देशात दिवसभरात 3 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर देशातील मृतांची एकूण संख्या 3 लाख 44 हजार 82 वर पोहोचली आहे. देशातला सध्याचा कोरोना मृत्यू दर 1.20 टक्के आहे.

देशातील 377 जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दैनंदिन रुग्णसंख्येने 7 मे रोजी शिखर गाठले होते. परंतु त्यानंतर आता त्यात 68 टक्क्यांनी घट झाली आहे. लसीकरणात प्रौढांना प्राधान्य देण्यात येणार असून लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही तातडीने निर्णय होणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. देशातील 66 टक्के नवी रुग्णसंख्या फक्त 5 राज्यांपुरती मर्यादित राहिली आहे, अशी माहितीही देण्यात आली.

Back to top button