ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी सीएम ठाकरे पीएम मोदींना भेटणार  | पुढारी

ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी सीएम ठाकरे पीएम मोदींना भेटणार 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (ता.०७) पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येत्या १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षण कळीचा आणि अत्यंत संवेदनशील मुद्दा झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्यावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. संभाजीराजे यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकल्यानंतर भाजपनेही आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणावर फुली मारण्यात आल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. 

संभाजीराजेंची रायगडावरून घोषणा

येत्या १६ जूनपासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देत त्यांनी १६ जूनपासून आंदोलनाची घोषणा केली आहे. 

इतर सर्व समाजांचे आरक्षण आहे पण मराठ्यांना आरक्षण नाही

मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, मी नेहमी बहुजन समाजाचे विषय मांडत आलो आहे. रायगडावर नेहमीच मी राजकारण विरहित बोलतो. मी राजकारणी नाही. राजकारण जवळपास येऊ देत नाही. पण समाजाचे नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मराठा समाज वाईट परिस्थिीतीतून जात असताना मी बोलायचे नाही? शिवाजी महाराजांची अठरा पगड जातीचे राज्य केले. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले त्यात मराठा समाज होता. आज इतर सर्व समाजांचे आरक्षण आहे पण मराठ्यांना आरक्षण नाही. तरीही आम्ही आवाज उठवायचा नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. आमचा हक्क आम्ही मागितला. 

 

Back to top button