देशात गेल्या २४ तासात तब्बल ६ हजार १४८ जणांचा कोरोनाने बळी | पुढारी

देशात गेल्या २४ तासात तब्बल ६ हजार १४८ जणांचा कोरोनाने बळी

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाच्‍या नव्‍या रुग्‍णांची संख्‍या एक लाखांपेक्षा कमी नोंदवली गेली; पण मागील २४ तासात तब्‍बल ६ हजार १४८ रुग्‍णांचा मृत्‍यू  झाला. कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍यांचीही आजवरची ही सर्वात मोठी संख्‍या ठरली आहे.  मागील २४ तासांत ९४ हजार ०५२ नवे रुग्‍ण आढळले. १ लाख ५१ हजार ३६७ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत, अशी माहिती आरोग्‍य विभागाच्‍या सूत्रांनी दिली. 

अधिक वाचा : रेमडेसिव्हीर, स्टेरॉइड देऊ नये! कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

देशभरात आतापर्यंत २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ जण कोरोनाबाधित झाले तर २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ६७६ रुग्‍णांचा बळी गेला आहे. सध्‍या ११ लाख ६७ हजार ९५२ रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत, असेही आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा : देशाचा कोरोनामुुक्‍ती दर ९४.५५ टक्के!

तब्‍बल ६३ दिवसांनंतर  मंगळवारी नव्‍या रुग्‍णांची संख्‍या एक लाखांपेक्षा कमी नोंदवली गेली होती. यामध्‍ये काही वाढ झाली. मात्र रुग्‍णसंख्‍या एक लाखांपेक्षा कमी नोंदली गेल्‍याने आरोग्‍य विभागावरील ताण कमी होण्‍यास मदत झाली आहे. कोरोनाची दुसर्‍या लाटेमुळे मे महिन्‍यात रुग्‍णवाढीचा कहर झाला होता. दररोज नव्‍याने आढळणार्‍या रुग्‍णांचा आकडा चार लाखांच्‍या घरात गेला होता. तसेच मृत्‍यूनेही थैमान घातले होते. आता रुग्‍णसंख्‍या कमी झाल्‍याने सर्वाधिक बाधित राज्‍यांमध्‍ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. 


 

Back to top button