आयएनआय - सीईटी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा – देशभरातील सर्व एम्स, जेआयपीएमईआर, पीजीआयएमईआर, निमहन्स आदी शिक्षण संस्थांमधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची आयएनआय – सीईटी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा महिनाभर पुढे ढकलली जात असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
येत्या १६ तारखेला आयएनआय – सीईटी परीक्षा होणार होती. कोरोना संक्रमण लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली जावी, अशा विनंतीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. १६ तारखेलाच परीक्षा घेण्याचा निर्णय वादग्रस्त असून एका महिन्यानंतर ही परीक्षा कधीही घेतली जाऊ शकते, असे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी निकाल देताना सांगितले.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसकडून दरवर्षी आयएनआय – सीईटी परीक्षा घेतली जाते. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली जावी, अशी याचिका विविध राज्यातील २६ डॉक्टरांनी गेल्या आठवड्यात दाखल केली होती. पंतप्रधान कार्यालयाने आश्वासन देऊनही परीक्षा घेण्याचा एम्सचा निर्णय वेदनादायी असल्याचे डॉक्टरंनी याचिकेत नमूद केले होते.