प्रीतम मुंडेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता | पुढारी

प्रीतम मुंडेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशात महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे तसेच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे यांच्या  दिल्ली दौऱ्यामुळे शक्यतांना बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे.

मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन  महाराष्ट्रातील ओबीसी चेहऱ्याला प्रतिनिधित्व देण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असल्याची चर्चा रंगली आहे. पूनम महाजन यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

एनडीए मधून शिवसेना बाहेर पडल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अशात केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून नारायण राणे यांना या मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठा आरक्षणासह  शिवसेनेला थेट अंगावर घेण्यासाठी भाजपकडे नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप चा विस्तार करण्यासाठी राणे यांची मदत होऊ शकते. राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्या नंतर कोकणात पक्ष विस्तारास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय नेतृत्वाला असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. संभावित मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी बैठकीत चर्चा झाल्याची चर्चा त्यानंतर रंगली आहे. अशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button