कर्जदार म्‍हणून आले, १७ किलो सोने लुटले !  | पुढारी

कर्जदार म्‍हणून आले, १७ किलो सोने लुटले ! 

चूरु (राजस्‍थान); पुढारी ऑनलाईन:  राजस्‍थानमधील चूरु शहरातील सोने तारण ठेवून कर्ज देणार्‍या कंपनीच्‍या कार्यालयात फिल्‍मीस्‍टाईल चोरीने एकच खळबळ उडाली. चौघेजण कर्जदार म्‍हणून कंपनीच्‍या कार्यालयात आले. त्‍यांनी अवघ्‍या १२ मिनिटांत कार्यालयातील १७ किलो सोने व ८.९२ लाखांची रोकड लंपास केली. मात्र सतर्क पोलिसांनी अवघ्‍या तीन तासात या चोरट्यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. 

फिल्‍मीस्‍टाईल थरार…

चिरु येथील एका सोने तारण ठेवून कर्ज देणार्‍या कंपनीच्‍या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. सोमवारी दुपारी लंच टाईम झाला होता. शाखाधिकार्‍यासह चार कर्मचारी कार्यालयात होते. याचवेळी चार तरुण कार्यालयात आले. सर्वांचे चेहरे पूर्णपणे झाकले होते. कोरोनामुळे त्‍यांनी मास्‍कबरोबर चेहरेही झाकले असावेत, असा कयास कर्मचार्‍यांनी व्‍यक्‍त केला. यावेळी एका तरुणाने सोने तारण ठेवून कर्ज घेणार असल्‍याची माहिती दिली. यातील एकाने आपल्‍याकडील सोन्‍याची अंगठीही दिली. यावर कर्ज हवे आहे, असे सांगितले. यानंतर चौघाही चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून कार्यालय आतून बंद केले. मोबाईल फोन हिसकावून घेत सर्व कर्मचार्‍यांना बाथरुममध्‍ये कोंडले. यानंतर तब्‍बल १७ किलो सोने आणि ८.९२ लाख रुपयांची रोकड ताब्‍यात घेवून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. 

अवघ्‍या तीन तासांत चोरटे जेरबंद 

सीसीटीव्‍हीमध्‍ये ही फिल्‍मी स्‍टाईल चोरी कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्‍ही फुटेजवरुन दुचाकीचे नंबर तपासले. यावरुन चोरट्यांचा शोध सूरु केला. राजस्‍थान आणि हरियाणा सीमेवर नाकाबंदीही करण्‍यात आली होती. मात्र चोरट्‍्यांनी चूरु येथेच आपली दुचाकी सोडून कारने पसार झाल्‍याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी तत्‍काळ कारवाई करत सुरेवाला चौकात चोरट्यांना अडवले. पोलिसांनी कारला घेरल्‍यानंतर चोरट्याने पलायनाचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी ९ कोटींच्‍या ऐवजासह चोरट्यांना जेरबंद केले. यावेळी दोन चोरटे पसार झाले. या दोघांचाही शोध सुरु असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. 

 

Back to top button