लष्कराकडून समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्गिकेवर चाचणी | पुढारी

लष्कराकडून समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्गिकेवर चाचणी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

रेल्वेकडून नुकतीच समर्पित मालवाहतुक मार्गिका (डीएफसी) विकसित करण्यात आल्याने देशभरात वेगाने मालवाहतुक सेवा पुरवली जात आहे. लष्कराने नुकतीच नवी रेवाडी (हरियाणा) ते नवी फुलेरा (राजस्थान) स्टेशन दरम्यान लष्करी रेल्वेची यशस्वी चाचणी  घेतली. यात सैन्याची वाहने आणि उपकरणे होती. लष्कराच्या चाचणीमुळे डीएफसीच्या कार्यक्षमतेवर  शिक्कामोर्तब झाल्याचा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

लष्कराचे, भारतीय समर्पित मालवाहतुक मार्गिका महासंघ लिमिटेड ( डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) आणि भारतीय रेल्वेबरोबर असलेल्या  समन्वयाने लष्करासंबंधित वाहतुकीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या चाचण्या, राष्ट्रीय संसाधनांच्या अनुकुलतेसाठी आणि विविध मंत्रालये तसेच विभागांमधे ताळमेळ राखला जावा याकरता “संपूर्ण राष्ट्र” दृष्टीकोनाचा एक भाग होता, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

लष्कराचा रेल्वे आणि डीएफसीसीआयएल सह संबंधित घटकांबरोबरच्या परस्पर संवादामुळे सैन्यदला संबंधित वाहतुकीसाठी डीएफसी आणि संबंधित पायाभूत सुविधेचा लाभ घेता येईल. यादृष्टीने ठराविक ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. त्यातून सैन्याच्या ‘रोल ऑन रोल ऑफ’ (रोरो) सेवेवर  सहाय्य केले जाईल. यासाठी कार्यपद्धतीही विकसित केली जात आहे. या चाचण्या, लष्कराची कार्यप्रवणतेची  सज्जता वाढवण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचे पहिले पाऊल आहे. हा उपक्रम राष्ट्रीय पायाभूत सुविधां अंतर्गत नियोजनाच्या टप्प्यावरच सैन्याच्या गरजा पूर्ण  होण्याची प्रक्रिया सुनिश्चित करेल, असा विश्वास मंत्रालयाने  व्यक्त केला आहे.

 

Back to top button