गौतम अदानींचे आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरे स्थान घसरणार? | पुढारी

गौतम अदानींचे आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरे स्थान घसरणार?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अदानी ग्रुपमधील ६ कंपन्यांपैकी ४ कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी देखील घसरण झाली. यामुळे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानींना दोन दिवसांत ५.५ अब्ज डॉलर म्हणजेच ४०,३१७ कोटींचा फटका बसला. अदानींच्या संपत्तीत यावर्षी ३७.८ अब्ज डॉलरने वाढ झाली होती. पण त्यांच्या कंपन्यांचे शेअर घसरल्याने त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. तरीही अदानींचे जगातील श्रीमंतांच्या यादीतील १४ वे स्थान कायम आहे. 

वाचा : अदानींचे शेअर्स एका ट्विटवर पाडणाऱ्या सुचेता दलाल कोण आहेत?

हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळे सोमवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांना मोठा फटका बसला. त्यांचे शेअर्स ५ ते २० टक्क्यांनी घसरले. अदानी ग्रुपमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यातील तीन विदेशी कंपन्यांची खाती नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) गोठवल्याचे वृत्त समोर आले.  या कंपन्यांची अदानी ग्रुपमध्ये सुमारे ४३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असून त्यांचे शेअर्स गोठवण्यात आले. यामुळे अदानी ग्रुपच्या या कंपन्यांना मोठा फटका बसला.

वाचा : स्कूटर ते हेलिकाॅप्टर! श्रीमंत गौतम अदानी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कसे झाले…

अदानी ग्रुपच्या ६ सुचीबद्ध कंपन्यांपैकी ४ कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी देखील घसरण दिसून आली.अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये ५-५ टक्के, अदानी पॉवरच्या शेअरमध्ये ४.९७ टक्के आणि अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये ०.९४ टक्क्यांनी घसरण झाली. तर दुसरीकडे अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये २.७९ टक्क्यांनी, अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्ये २.४५ टक्क्यांनी तेजी दिसून आली.

अदानी अजूनही आशियातील श्रीमतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी कायम आहेत. मात्र आता त्यांचे स्थान घसरण्याची शक्यता आहे. चीनचे झोंग शैनशैन आशियात तिसऱ्या आणि जगातील श्रीमतांच्या यदीत १५ व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७०.१ अब्ज डॉलर एवढी आहे. अदानींपेक्षा त्यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलरने कमी आहे. मुकेश अंबानी ब्लूमबर्ग बिलेनियर निर्देशांकात १२ व्या स्थानी आहेत. मंगळवारी त्यांच्या एकूण संपत्तीत १.२२ कोटी डॉलरने वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती ८६.५ अब्ज डॉलर एवढी असून ते आशियातील श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. 

ब्लूमबर्ग बिलेनियर निर्देशांकानुसार ॲमेझॉनचे मालक आणि सीईओ जेफ बेजोस जगातील श्रीमतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती १९६ अब्ज डॉलर एवढी आहे. 

वाचा : सुचेता दलाल यांचे एक ट्विट आणि गौतम अदानींचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले 

Back to top button