'बाबा का ढाबा' मालकांचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

'बाबा का ढाबा' मालकांचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोना महारोगराई दरम्यान करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान प्रकाशझोतात आलेले बाबा का ढाबा चे बाबा, कांता प्रसाद यांनी आत्म​हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पंरतु, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पावूल उचलल्याचे बोलले जात आहे.

​पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास पीसीआर व्हॅनला कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी नशेत झोपेच्या गोळ्या घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते  तणावात होते, अशी माहिती त्यांची पत्नी बादामा देवी यांनी पोलिसांना दिली.

यूट्यूबर गौरव वासन याने दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ढाबा चालवणारे कांता प्रसाद बाबा यांचा एक व्हिडिओ यूट्यूब वर पोस्ट केला होता. या एका व्हिडिओनंतर ते प्रसिद्ध झाले. लॉकडाऊनमध्ये रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या मदतीसाठी देशभरातील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. यानंतर बाबांचे आर्थिक गाडे रूळावर आले होते. लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातून त्यांनी नवे रेस्टारंट सुरू केले. रेस्टारंटमध्ये दोन स्वयंपाकी तसेच एक मदतनीस देखील त्यांनी ठेवले होते. पंरतु, रेस्टारंटमधून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने नाईलाजास्तव त्यांना ते विकावे लागले. रेस्टारंटमधील सामानाची विक्री करून त्यांना ३० ते ४० हजार रूपये मिळाले होते, अशी माहिती त्यांच्या मुलाकडून देण्यात आली आहे. युट्यूबर गौरव आणि कांता प्रसाद यांच्यात झालेल्या वादामुळे ते कायम चर्चेत राहिले.

गौरवच्या व्हिडिओ नंतर कांता प्रसाद यांच्याकडे आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. पंरतु, या व्हिडिओतून मिळालेल्या पैशांचा गैरवापर केल्यासंबंधीचा आरोप कांता प्रसाद यांच्याकडून करण्यात आला होता. नुकतीच बाबा यांनी वासन यांची क्षमा मागितली. रेस्टारंट बंद केल्यानंतर पुन्हा एकादा कांता प्रसाद त्यांच्या जुन्या ढाब्यावर पोहचले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे त्यांना ढाबा देखील बंद करावा लागला होता.

वाचा : अतिवृष्टीचे दिवस वाढले; काय कारण आहे यामागे?

वाचा : रोनाल्डोच्या कृतीवर अनेक मीम्स व्हायरल!

Back to top button