प्रशांत किशोरांच्या I-PAC चे काम कसं चालतं? ज्यांनी पीएम मोदींना जिंकून आणि हरवूनही दाखवले! | पुढारी

प्रशांत किशोरांच्या I-PAC चे काम कसं चालतं? ज्यांनी पीएम मोदींना जिंकून आणि हरवूनही दाखवले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या राजकारणात सर्वांत शक्तीशाली राजकीय व्यक्तीमत्व असलेल्या पीएम मोदींना सर्वांधिक वेळा हरवणाऱ्या व्यक्तींमध्ये राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा समावेश होतो. तथापि, आपल्याला प्रशांत किशोर हे एक नाव माहीत असलं तरी पडद्यामागे अनेक चेहरे आहेत जे त्यांच्यासाठी एक टीम म्हणून कार्यरत आहेत.  

अधिक वाचा : प्रशांत किशोर : मोदींना निवडणुकांत सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हे काही एकटे नसून त्यांच्यासोबत एक मोठा परिवार काम करतो. पीके म्हणजे प्रशांत किशोर यांच्याकडे राजकीय रणनीतीवर बारकाईने काम करण्यासाठी एक मोठी टीम आणि त्याहूनही मोठे कार्यालय आहे. हे कार्यालय कॉर्पोरेट कंपनीसारखेच आहे. त्यांच्या कंपनीचे नाव I-PAC आहे. आम्ही तुम्हाला पीकेंच्या आय-पॅक कंपनीची टीम, विभाग तसेच त्यांच्या कंपनीच्या ट्री स्ट्रक्चरविषयी सांगणार आहोत. 

प्रशांत किशोर यांनी आपल्या तीन मित्रांसह म्हणजेच प्रतीक जैन, ऋषीराज सिंह आणि विनेश चंदेल यांच्यासह २०१३ मध्ये सिटीझन फॉर अकाउंटेबल गव्हर्नसची स्थापना केली. नंतर हे नाव बदलून  I -PAC असे करण्यात आले.  I-PAC चे  पूर्ण नाव इंडियन पॉलिटीकल ॲक्शन कमीटी आहे. जेथे राजकीय रणनीतींबरोबर देशाच्या कारभाराची दिशा आणि स्थिती यावरही काम केलं जातं. I-PACच्या माध्यमातून पीके यांनी २०१४ साली नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रचाराची जबाबदारी स्वीकारली. पहिल्यांदाच भाजपने पक्ष म्हणून राजकीय धोरण, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला.


 

यानंतर बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांच्या यशामागे पीके यांचाच हात होता. पंजाबमधील अमरिंदर सिंग आणि आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी यांच्यासाठीही पीकेच्या कंपनीने प्रचंड काम केले. अलीकडील बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्याबरोबरही त्यांचे काम पाहिले गेले. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपने बंगालमध्ये १०० हून अधिक जागा जिंकल्यास ट्विटर सोडण्याचे चॅलेंज दिले होते. त्यामुळे प्रशांत किशोर चांगलेच चर्चेत होते. कारण या निवडणुकीसाठी भाजपने साम, दाम, दंड, भेद या सर्व रणनीतीचा वापर केला होता, पण तरीही त्यांना शंभरी गाठता आली नाही. 

अधिक वाचा : शरद पवार खरंच मोदींविरोधी उभे राहतील?; प्रशांत किशोर यांच्या भेटीमागे काय घडले? 

प्रशांत यांच्याबरोबर कंपनी सुरू करणारे प्रतीक जैन, ऋषीराज सिंह आणि विनेश चंदेल हे कंपनीचे सह-संस्थापक आहेत. प्रशांत किशोर कंपनीचे संचालकही आहेत. प्रतीक जैन यांनी आयआयटी मुंबईमधून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे आणि डेलॉइट इंडिया कंपनीमध्ये ॲनालिस्ट म्हणून काम पाहिलं आहे. ऋषीराज सिंह आय-पॅकचे दुसरे सह-संस्थापक आणि आयआयटी कानपूरचे प्रॉडक्ट आहेत. ते सुद्धा आय-पॅकच्या नेतृत्वात काम करतात. 

विनेश चंदेल हे कंपनीचे तिसरे सह-संस्थापक आहेत आणि त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकीली केली आहे. आय-पॅकच्या कार्यकारी परिषदेमद्ये 10 ते 12 लोक असून ते सर्व आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत.

अधिक वाचा : पश्चिम बंगाल निवडणूक निकाल : प्रशांत किशोर म्हणतात आम्ही नरकातून गेलो

कंपनीमध्ये कमीत कमी १ हजार लोक कार्यरत आहेत. हैदराबादमधील बंजारा हिल्ससारख्या पॉश क्षेत्रात कंपनीचे मुख्यालय आहे. चार मजली कार्यालयात वेगवेगळ्या मजल्यांवर वेगवेगळे विभाग आहेत. त्याच वेळी, ज्या राज्यात आय-पॅक काम करते, तेथे तात्पुरते कार्यालय देखील तयार केले जाते.

आय-पॅकचे काम डझनभराहून अधिक विभागाची रचन असून ते वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जातात. ज्यात क्रिएटिव्ह, ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, स्ट्रॅटेजिक रिसर्च, पॉलिटिकल इंटेलिजन्स, लीडरशिप, डेटा अ‍ॅनालिस्ट, सोशल मीडिया, डिझायनिंग, फोटोग्राफर्स या विभागांचा समावेश आहे.

Back to top button