गंगेच्या वाढत्या पाण्याबरोबर मृतदेह पुन्हा तरंगू लागले | पुढारी

गंगेच्या वाढत्या पाण्याबरोबर मृतदेह पुन्हा तरंगू लागले

लखनौ ; वृत्तसंस्था : पावसाच्या पाण्यामुळे गंगा नदीची पातळी वाढत असून या पाण्याबरोबर  प्रयागराजच्या काठावर पुरण्यात आलेले मृतदेह पुन्हा तरंगू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. या मृतदेहाचे दफन आणि अंत्यसंस्कार महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहेत.

गेल्या 24 तासांत अशा 40 मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार केल्याचे प्रयागराज महापालिकेचे विभागीय अधिकारी नीरजकुमार सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काही मृतदेह नुकतेच पुरलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यूपी आणि बिहारमध्ये गंगेच्या काठावरील वाळूत मोठ्या प्रमाणात मृतदेह पुरल्याचे प्रकरण माध्यमांनी मे महिन्यात उघड केले होते. त्यानंतर कोरोना मृत्यूचे आकडे यूपी सरकारने लपवले. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचेच हे मृतदेह आहेत, असे आरोपही करण्यात आले होते. हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला होता. 

या पार्श्‍वभूमीवर आता गंगेत पुन्हा मृतदेह तरंगत येऊ लागले आहेत. त्याचे व्हिडीओ आणि फोटो माध्यमांतून समोर येत आहेत. त्यामुळे सरकार आणि महापालिका यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे.

 

Back to top button