पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिस ठाणेच जाळले! | पुढारी

पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिस ठाणेच जाळले!

गुवाहाटी : पुढारी वृत्तसंस्था :  आसाममधील नागाव जिल्ह्यातील बाताद्रवा पोलिस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हे पोलिस ठाणेच पेटवून देण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. यानंतर प्रशासनाने हिंसाचारात सहभागी असलेल्या 3 जणांना आगीच्या घटनेच्या व्हिडीओ फुटेजवरून हेरून त्यांच्या घरावर रविवारी बुलडोझर चालविले. तथापि, अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत ही घरे पाडण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दुसरीकडे नागाव जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शफिकूल इस्लाम या मासळी विक्रेत्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस ठाणे पेटविणार्‍यांत मृताचे नातेवाईक नव्हते, ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, असे स्थानिक गुन्हेगार होते. गुन्ह्यांचे रेकॉर्ड व पुरावे जाळून टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी पोलिस ठाणे पेटविले. चाळीस जण या गुन्ह्यात सहभागी होते, पैकी 21 जणांची ओळख पटली असून, या सर्वांना अटक करण्यात आली आहे. चार महिलांचा त्यात समावेश आहे.

Back to top button