नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही सोन्याचे (Gold Rate) दर गडगडले आहेत. एमसीएक्स बाजारात सोमवारी सकाळी सोन्याच्या (Gold Rate) प्रती 10 ग्रॅमच्या दराने 46 हजार 29 रुपयांची निचांकी पातळी गाठली होती. गोल्ड फ्यूचरमध्ये झालेली घट 600 रुपयांची म्हणजे 1.3 टक्क्यांची होती.
सोन्याबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचे प्रती किलोचे दर एक हजार रुपयांनी कमी होऊन 63 हजार 983 रुपयांवर आले आहेत.
रविवारी सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची तर चांदी दरात दोन हजार रुपयांची घसरण झाली होती. त्यापाठोपाठ सोमवारीदेखील धातूंचे दर उतरले आहेत.
जागतिक बाजारात सोन्याचे दर 4.4 टक्क्यांनी गडगडले होते. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात लवकर वाढ केली जाण्याची शक्यता असल्याने सोने-चांदी तसेच इतर धातूंच्या दरात घसरण होत असल्याचे बाजार सूत्रांचे म्हणणे आहे.
जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचे प्रती औंसचे दर 1722 डॉलर्सवर आले आहेत.
दुसरीकडे चांदीचे प्रती औंसचे दर 23.70 डॉलर्सवर आले आहेत. आगामी काळातही सोने-चांदीचे दर असेच कायम राहण्याची शक्यता आहे.