राहुल गांधी म्हणाले, लडाखमध्ये युक्रेनसारखी स्थिती | पुढारी

राहुल गांधी म्हणाले, लडाखमध्ये युक्रेनसारखी स्थिती

लंडन ; वृत्तसंस्था : चीनने लडाख आणि डोकलाममध्ये युक्रेनसारखी परिस्थिती निर्माण केली आहे; मात्र भारत सरकारकडून काहीच पावले उचलली जात नाहीत. सरकार चीनला जाब विचारण्यास घाबरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भाजपकडून देशात माफियाराज चालवले जात असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांना केला.

केब्रिंज विद्यापीठात आयोजित केलेल्या आयडीआय ऑफ इंडिया सेमिनारमध्ये राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार सर्वच बाबींचे धु्रवीकरण करत आहे. देश उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण आम्ही तसे करू देणार नाही. भाजपने घटनात्मक संस्थांवर आपला कब्जा केला आहे. सरकारी संस्थांमध्ये मागच्या दरवाज्यातून काही लोकांना स्थान दिले जात आहे. देशातील लोकशाही स्थिती खूपच बिकट आहे.

काँग्रेसच्या पराभवाचे चिंतन झाले आहे. आता आम्हाला लोकांत मिसळायचे आहे. त्यामुळे आम्ही खूपच आक्रमक धोरण अवलंबले असून लोकांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यास प्राधान्य दिले जात आहे. पक्षात अंतर्गत वाद जरूर आहेत, पण आता वाद मिटवून पक्षासाठी काम करा, असा सल्ला सर्व काँग्रेस नेत्यांना दिला असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत भाजप सरकार गंभीर नाही. 1091 धोरणानुसार आताचे प्रश्न सुटणार नाहीत. 2012 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर जुन्या धोरणांना मूठमाती दिली पाहिजे, असे सांगितले होते. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकराकडून काहीच प्रयत्न केले जात नसून सरकार कोणाचेच ऐकत नसल्याचा आरोपही राहुल गांधीनी यावेळी केला.

Back to top button