गंगेतील मृतदेह; एसआयटी तपास होणार नाही | पुढारी

गंगेतील मृतदेह; एसआयटी तपास होणार नाही

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना काळात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेत आढळलेल्या मृतदेहासंबंधी विशेष तपास पथकाकडून एसआयटी तपासणी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. एखाद्या जनहित याचिकेप्रमाणे या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमत नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने याचिकाकर्त्याला संबंधित प्राधिकरणात जाण्यास सांगितले.

प्रदीप यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेतून बिहारमधील बक्सर आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूर, उन्‍नावमध्ये गंगेत आढळून येणार्‍या मृतदेहासंबंधीची तपासणी एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली होती. गंगेत वाहून येणार्‍या सर्व मृतदेहांना बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यात यावे, तसेच दोषींवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. गंगेत जवळपास 100 मृतदेह आढळले आहेत. यातील 71 मृतदेह बिहारमधील बक्सरमध्ये, तर 30 मृतदेह उत्तर प्रदेशातून बाहेर काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यामुळे 100 गरीब व्यक्‍तींच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश द्यावेत, सोबतच मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेतून केली होती. प्रतिमा जपण्यासाठी प्रशासनाने वास्तविक शवविच्छेदन न करताच खोटी कारवाई केली असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता.

 

Back to top button