पुरोगामी महाराष्ट्राला भाजप-शिवसेना युतीची गरज : भाजप नेते आनंद रेखी | पुढारी

पुरोगामी महाराष्ट्राला भाजप-शिवसेना युतीची गरज : भाजप नेते आनंद रेखी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला विकासाची गती देण्यासाठी खऱ्या अर्थाने भाजप-शिवसेना युतीची नितांत गरज आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ एकमेकांसोबत असलेल्या या हिंदुत्ववादी पक्षांनी आपआपली जबाबदारी ओळखून राज्य हितासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमधून हे अधोरेखित होत आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आनंद रेखी (Anand Rekhi) यांनी मंगळवारी केले.

हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कणखर नेतृत्वामुळेच २५ वर्ष युती टिकली, रुजली. या नेत्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे युतीला जपले, जोपासले. परंतु, काळालाही विकासासाठी भाग पाडणाऱ्या या समविचारी पक्षांची युती तुटल्यापासून राज्याची प्रगती मंदावली आहे. महाविकास आघाडीसारखा प्रयोगात्मक युतीतून सर्वसामान्यांची फसगत झाल्याचे चित्र उभे झाले आहे. अशात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रवासियांच्या मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन रेखी (Anand Rekhi) यांनी केले.

गेल्या दोन दशकांपर्यंतसोबत असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी आता एकमेकांवर चिखलफेक करीत इतरांची करमणूक करणे बंद करावी. या पक्षांनी आता एकत्रित येवून विकासकामांचा धडाका लावला पाहिजे. अनेक कामे खोळंबली आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आयती सत्ता मिळाली आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button