आसाममध्ये पावसाचा हाहाकार | पुढारी

आसाममध्ये पावसाचा हाहाकार

गुवाहाटी : वृत्तसंस्था आसाममध्ये पावसाने हाहाकार माजवला असून राज्यातील पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील सुमारे 57 हजार लोकांना महापुराचा फटका बसला आहे, तर 15 महसूल विभागातील सुमारे 222 गावे जलमय झाली आहेत. तसेच 10 हजार 321 हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

कछार जिल्ह्यातील महापुराची स्थिती तर फारच गंभीर झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 685 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे, तर एका मुलासह 3 लोक बेपत्ता झाले आहेत. लष्कर, निमलष्करी दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत. मुसळधार पाऊस सलग सुरू असल्याने होजई, लखीमपूर आणि नागाव जिल्ह्यातील रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे. दिमा हसाओ जिल्ह्यातील रेल्वे लाईनच वाहून गेली आहे. डोंगरी भागात भूस्खलनामुळे रेल्वे ट्रॅकचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रवाशांना केले एअर लिप्ट 

लुमडिंग डिव्हिजनमधील लुमडिंग-बदरपूर डोंगरी भागात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पाण्यामुळे रेल्वे सेवेत बदल करण्यात आला आहे. अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना एअर लिप्टद्वारे बाहेर काढले आहे.

Back to top button