रशिया-युक्रेन युद्ध यामुळे गहू टंचाई | पुढारी

रशिया-युक्रेन युद्ध यामुळे गहू टंचाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गहू जगभरातील थाळ्यांमध्ये पोळी, नान, पराठा, पाव असा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतोच असतो; पण जगभरात गहू पिकत मात्र नाही. त्यात गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्ध यामुळे गव्हाची पुरवठा यंत्रणाच कोलमडली आहे. जगाच्या एकूण गहू निर्यातीत युक्रेन आणि रशियाचा वाटा 25 टक्क्यांवर आहे, हे येथे महत्त्वाचे!

रशियाने काळ्या समुद्रातील युक्रेनच्या बंदरांची नाकाबंदी केली आहे. गव्हाचा युरोपला होणारा पुरवठाच तेव्हापासून थांबला आहे. भरीस भर म्हणून भारतानेही गहू निर्यातीवर बंदी घातली आहे. रशिया हा जगातील गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. युक्रेन आणि रशिया मिळून युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियातील कोट्यवधी लोकांचे पोट भरतात. पुतीन यांनी युद्धापूर्वीच 2021 मध्ये गहू निर्यातीवर मर्यादा घातल्या होत्या.

भारतानेही अंतर्गत दर नियंत्रणासाठी तसेच एखाद्या देशावर अन्‍नटंचाईचे संकट कोसळल्यास गहू पुरविता यावा म्हणून निर्यातीवर आता बंदी घातली आहे. परिणामी, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, अमेरिका हेही मोठे गहू उत्पादक देश आहेत. यासह अन्यत्र उत्पादित गव्हाचे दर स्पर्धा कमी झाल्याने वाढले आहेत.

Back to top button