वीस वर्षांत एकवेळचे जेवण तिपटीने महागले! | पुढारी

वीस वर्षांत एकवेळचे जेवण तिपटीने महागले!

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. इंधन असो, औषध असो, की रोजचा भाजीपाला… सगळ्यांच्या किमती नवनवे शिखर गाठत आहेत. या महागाईचा परिणाम आता रोजच्या जेवणावरही होऊ लागला आहे. एका विश्‍लेषणानुसार, गेल्या वीस वर्षांपूर्वी एकवेळच्या जेवणाच्या ताटासाठी येणारा 23 रुपये खर्च आता तिपटीने वाढून सरासरी 78 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर गेल्या आठ वर्षांतील उच्चांकावर आहे. यात खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडल्याचे दाहक वास्तवही समोर आले आहे.

दहा वर्षांत किराणा 68 टक्क्यांनी महाग

घाऊक किंमत निर्देशांकानुसार (डब्ल्यूपीआय) गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आठवड्याचा किराणा माल तब्बल 68 टक्क्यांनी महागला आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांत आता तीन जणांच्या कुटुंबाला आठवड्याच्या किराणासाठी साधारण 4 हजार मोजावे लागत आहेत. 2012 मधील स्थितीशी तुलना केली तर आताच्या घडीला होणार्‍या खर्चाचा आकडा दुप्पट आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (सीपीआय), एका कुटुंबासाठी लागणार्‍या किराणा आणि खाद्यपदार्थांच्या किमती जानेवारी 2014 ते मार्च 2022 या दरम्यानच्या काळात तब्बल 70 टक्क्यांनी वाढल्या.

खाद्यपदार्थांच्या दरात दरमहा 4.4 टक्के वाढ

गेल्या आठ वर्षांच्या काळात खाद्यपदार्थांचे दर दरमहा सरासरी 4.4 टक्क्यांनी वाढले. सरकारी आकड्यांनुसार मार्च 2021 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये हा दर 7.68 टक्क्यांनी जास्त होता. जानेवारी 2014 मध्ये ज्या वस्तूची किंमत शंभर रुपये होती, तीच मार्च 2022 मध्ये 170 रुपयांच्या घरात पोहोचली.

…म्हणून महागाईत वाढ

महागाईच्या या उद्रेकाला जागतिक बाजारपेठेत विशेषतः कृषी क्षेत्राशी संबंधित वस्तूंच्या दरात झालेली वाढ कारणीभूत आहे. तसेच इंधन आणि गॅसचे वधारलेले दर, त्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेली व्याज दरवाढ, रशिया-युक्रेन संघर्ष तसेच लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेली पुरवठा साखळी जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Back to top button