राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब | पुढारी

राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

उदयपूर (राजस्थान) ; वृत्तसंस्था : आगामी 2024 लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या संकल्प शिबिरातून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आगामी निवडणूक राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षातील ‘युवा ब्रिगेड’ रणांगणात उतरेल. पक्ष संघटनेपासून ते सत्ताकेंद्रापर्यंत काँग्रेसमधील 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांचा 50 टक्के वाटा असेल. पक्षाकडून तशी ‘ब्ल्यू प्रिंट’च तयार केली जात आहे. यावेळी अनेक मुद्दे नव्या पद्धतीने घेऊन पक्ष जनतेसमोर जाईल.

जातीय जनगणनेसह शेतीमालाच्या किमान हमीभावाला कायदेशीर खात्री, हे काँग्रेसचे दोन प्रमुख मुद्दे असतील. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये होणार्‍या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडेच पुन्हा काँग्रेसची कमान सोपविली जाणार आहे. त्यासाठीचा ‘रोड मॅप’ संकल्प शिबिरात तयार करणे सुरू आहे. सोनिया गांधी यांनी शनिवारी पक्षाचे सर्व महासचिव, प्रदेश प्रभारी, प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीत आगामी रणनीतीबद्दल चर्चा झाली. पक्षात आता युवकांना मोठा वाटा मिळणार आहे. पक्षात या दिशेने काम सुरू आहे, असे युवानेते सचिन पायलट यांनी सांगितले.

जातीय जनगणना, ‘एमएसपी’साठी संघर्ष

शेतकर्‍यांच्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी काँग्रेस एक आयोग बनविणार आहे. शेतकर्‍यांसाठी ‘एमएसपी’ (किमान हमीभाव) आणि त्याला कायदेशीर खात्री देण्याची घोषणा पक्ष आपल्या जाहीरनाम्यात करणार आहे. शेती समितीचे प्रमुख भूपिंदरसिंह हुडा यांनी किसान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची त्यासाठी भेटही घेतली होती. पक्षाच्या सामाजिक समितीने जनगणनेच्या विषयावर देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची सूचना पक्षाला केली आहे. जातीय जनगणनेची मागणी जुनीच आहे; पण केंद्र सरकारने गतवर्षी ती फेटाळून लावली होती.

काँग्रेसमध्ये 2024 पूर्वी संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार आहेत. संकल्प शिबिरात जिल्हास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंतच्या नेत्यांचे कार्यकाळ ठरणार आहेत. ‘रेडिमेड’ नेत्यांना निवडणुकांतून तिकीट देण्यात येणार नाही. सरकार स्थापनेतही संघटनात्मक कार्य करणार्‍या नेत्यांना प्राधान्य दिले जाईल. उदयपूर शिबिरातून त्याचे सूतोवाच झालेले आहे.

Back to top button