Monsoon : तयारीला लागा! मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

Monsoon : तयारीला लागा! मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

Monsoon update : 'असनी' चक्रीवादळाची तीव्रता आज गुरुवारी कमी झाली. सध्या हे वादळ आंध्र प्रदेशमधील मच्छीलीपट्टणमच्या पश्चिमेस घोंघावत आहे. पुढील १२ तासांत ते कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर वाढला आहे. यामुळे दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून वेळेआधीच दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील ४ आठवड्यात देशातील अनेक भागात पावसाचा अंदाज (Rainfall forecast) व्यक्त केला आहे.

पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाची शक्यता आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर पाऊस पडणार असल्याचे संकेत आहे. दुसऱ्या आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतचा आग्नेय अरबी समुद्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

'असनी' चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. 'असनी'मुळे मान्सूनची वाट (Monsoon update) 'आसान' होणार आहे. अंदमानात मान्सून १७ मे, तर केरळात २८ मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता असल्याचे याआधी हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यंदा मान्सून सामान्य राहील. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा शक्यता असल्याचे हवामान विभागाने याआधी म्हटले आहे. २०२२ मध्ये पावसाची दीर्घकालीन सरासरी (एलपीए) ९९ टक्के राहण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० या कालावधीत संपूर्ण देशात मान्सून हंगामातील पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी एवढी आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला निना परिस्थिती आहे. ला निनाची स्थिती पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news