पुढाारी ऑनलाईन डेस्क :
केरळमध्ये आता कोरोनापाठोपाठ टोमॅटो फीव्हरचा ( Tomato fever ) नवीन धोका निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत ८० हून अधिक लहान मुलांना याची लागण झाली आहे. राज्यातील लहान मुलांमध्ये याचा संसर्ग अधिक आहे. या फीव्हरबाबत डॉक्टरांमध्येही अजून संभ्रम आहे. डॉक्टरांच्या मते, टोमॅटो फीव्हर व्हायरल आहे की, चिकनगुनिया किंवा डेंग्यूच्या दुष्परिणामाचा संसर्ग आहे, हे आताच सांगणे कठीण आहे. केरळमधील काही भागातच हा आजार आढळून आला आहे, मात्र याला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना न केल्यास संसर्ग पसरू शकतो, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
केरळच्या शेजारील राज्यांमधून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कोईम्बतूरमध्ये वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. केरळमध्ये येणाऱ्यांची तामिळनाडू-केरळ सीमेवरील वालार येथे चाचणी केली जात आहे. राज्यभर तपासणी आणि उपचारासाठी २४ सदस्यीय पथके तयार करण्यात आली आहेत. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये जाऊन पाच वर्षांखालील मुलांची तपासणी केली जात आहे.
टोमॅटो फीव्हर हा एक प्रकारचा ताप आहे. केरळमधील पाच वर्षांखालील मुलांमध्ये हा आढळून आला आहे. त्यामुळे संसर्ग झालेल्या मुलांच्या शरीरावर पुरळ आणि फोड येतात. हे लाल रंगाचे असतात, म्हणून त्याला टोमॅटो फ्लू असे म्हणतात. लाल पुरळ आणि फोड ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. यामुळे रुग्णाला त्वचेचा संसर्ग आणि अपचनदेखील होऊ शकते. संक्रमित मुलांना खूप ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा, ओटीपोटात थकवा, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे आणि नाक वाहणे अशी लक्षणे दिसूण येतात.
हेही वाचा :