नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा नेपाळच्या नाईटक्लबमधला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावरुन विरोधकांना गांधी यांची घेराबंदी करण्याची आयती संधी मिळाली आहे. लॉर्डस् ऑफ ड्रिंक्स नावाच्या नाईटक्लबमध्ये राहुल गांधी एका महिलेसोबत दिसत असून मागे कर्णकर्कश आवाज येत असल्याचे दिसत आहे. खासगी दौर्यावर नेपाळला जात असल्याचे अलिकडेच राहुल गांधी यांनी सांगितले होते. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.
सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका चालवली आहे. सुट्टी,पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, खासगी विदेश दौरा या गोष्टी आता देशाला नवीन राहिलेल्या नाहीत, असा टोमणा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मारला आहे. दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधी कोणासोबत आहेत? ते चीनी एजंटसोबत आहेत काय? राहुल गांधी हे चीनच्या दबावाखाली सोशल मीडीयावर संदेश देत असतात? हा त्यांच्या खासगी जीवनाचा मुद्दा नसून देशाचा मुद्दा आहे…आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. पहचान कौन? असा उपरोधिक टोलाही मिश्रा यांनी मारला आहे.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले की, राजस्थानमधील जोधपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. या राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी हे नेपाळमधल्या नाईटक्लबमध्ये मजा मारत आहेत. खरे तर त्यांना भारतातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशात असावयास हवे होते. काँग्रेस ही संपलेली पार्टी आहे. मात्र राहुल गांधी यांची पार्टी चालूच राहील. राजकारणात ते गंभीर नाहीत. जेव्हा पक्षाला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये काय करीत आहेत, हे कोणाच्याही आकलनापलिकडे आहे. भाजपचे दुसरे प्रवक्ते अमित मालवीय यांनी मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हादेखील राहुल गांधी नाईटक्लबमध्ये होते, असे सांगत जेव्हा काँग्रेस संकटात असते, तेव्हा ते नाईटक्लबमध्ये असतात, असा टोला मारला आहे.
हेही वाचलंत का ?