पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसेच राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच सर्वात मोठी चिंता गुजरात काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष आणि पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) हळूहळू आपला सूर बदलत आहेत. गुजरात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या तक्रारी असल्याचं हार्दिक यांनी आधीच सांगितले आहे. आता त्यांनी हायकमांडला अल्टिमेटम दिला आहे. मी सध्या काँग्रेस पक्षात आहे, पण काँग्रेसमध्ये माझा कार्यकाळ चालू ठेवता यावा यासाठी हायकमांडला काहीतरी करावे लागेल, असा इशारा पटेल यांनी दिला आहे.
हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. पटेल म्हणाले, मी काँग्रेस सोडावी असे काही लोकांना वाटते. या लोकांना माझे मनोबल तोडायचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल (Hardik Patel) यांचा सूर बदललेला दिसत आहे. गुजरात काँग्रेसचे स्थानिक नेते ना स्वत: काम करत आहेत, ना कोणाला काम करू देत आहेत, असा आरोप त्यांनी यापूर्वीच केला आहे. यापूर्वी त्यांनी हायकमांडवर नाराज नसल्याचे सांगत काँग्रेस सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. पण पटेलांचा राग हा स्थानिक नेतृत्वावर असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल (Hardik Patel) भाजपचे कौतुक करताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी स्वत:ला रामभक्त असल्याचेही म्हटले होते. तसेच 370 कलम हटवणे आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी भाजपचे कौतुक केले होते. याशिवाय गुजरातमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा मजबूत असल्याचेही पटेलांनी वक्तव्य करून राजकीय वातावरण तापवले होते.
गुजरातमधील अनेक काँग्रेस नेत्यांची हार्दिक पटेल यांनी नाराजी ओढवून घेतली आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका लवकरत होतील. अशा वेळी प्रामाणिक आणि कणखर लोकांना सोबत घेऊन काम केले पाहिजे, त्यांना पदे दिली पाहिजेत, असे म्हटले होते. पटेल पुढे म्हणाले, गावपातळीवर काँग्रेस मजबूत करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे. हीच संधी आहे, गावागावात जा, शहरात मेहनत करा, असे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.