देशांतर्गत तीन महिन्यात पेटंट अर्जाच्या संख्येत वाढ | पुढारी

देशांतर्गत तीन महिन्यात पेटंट अर्जाच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या ११ वर्षांमध्ये पहिल्यांदाच, जानेवारी – मार्च २०२२ या तीन महिन्यात देशांतर्गत पेटंट दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भारतात आंतरराष्ट्रीय पेटंट दाखल करण्याच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे. एकूण १९,७९६ पेटंट अर्ज दाखल झाले.

यापैकी १०,७०६ भारतीय अर्जदारांनी दाखल केले तर ९,०९० गैर-भारतीय अर्जदारांकडून दाखल झाले आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये विशेष म्हणजे पेटंट दाखल करण्याचे प्रमाण २०१४-१५ मधील ४२,७६३ वरून २०२१-२२ मध्ये ६६,४४० पर्यंत वाढले आहे. गेल्या सात वर्षांच्या कालावधीत यामध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

तसेच, २०१४-१५ (५,९७८) च्या तुलनेत २०२१-२२ (३०,०७४) मध्ये पेटंट मंजूरीत जवळपास पाच पट वाढ झाली. तर पेटंट परीक्षणाचा कालावधी डिसेंबर २०१६ मध्ये ७२ महिन्यांवरून कमी होऊन सध्या सरासरी ५ ते २३ महिन्यांपर्यंत आला आहे. विविध तांत्रिक क्षेत्रांसाठीच्या २०१५-१६ मधील ८१ व्या क्रमांकाच्या तुलनेत २०२१ मध्ये भारताचा जागतिक नवोन्मेष निर्देशांक ४६ व्या क्रमांकावर पोहचला आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल याबाबत म्‍हणाले, भारतातील बौद्धीक संपदा नोंदणी व्यवस्था (IPR) बळकट करण्यासाठी नवोन्मेषता वाढवून आणि अनुपालनाचा भार कमी करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे, अशी भावना पीयूष गोयल व्यक्त केली. यामुळे आयपीआर अर्ज दाखल करण्याची संख्या वाढली आहे. तसेच आयपी कार्यालयांमध्ये पेटंट अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या अव्वल २५ राष्ट्रांमध्ये मुसंडी मारण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याकडे हे आणखी एक पाऊल जवळ घेऊन जाईल, असेही गोयल म्हणाले.

हेही वाचा  

Back to top button