पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्जवरून माघारीचा प्रस्ताव भारताने फेटाळला | पुढारी

पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्जवरून माघारीचा प्रस्ताव भारताने फेटाळला

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : पूर्व लडाख मधील हॉट स्प्रिंग्ज भागातील गस्तीच्या पॉईंट 15 वरून सैन्य माघारी घ्यावे, हा चीनचा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी गेल्या महिन्यात भारत दौर्‍यावर असताना त्यांनी हा प्रस्ताव भारतासमोर ठेवला होता. नुकतीच ही माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून चीनने लष्कर तैनात केले आहे. पेट्रोलिंग पॉईंट 16 व पेट्रोलिंग पॉईंट 17 दरम्यानच्या भागात व पेट्रोलिंग पॉईंट 15 लगत असलेल्या करमसिंग चौकीपर्यंत भारतीय लष्कराने आपले सैन्य मागे न्यावे, असा चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांचा प्रस्ताव होता. तो अर्थातच भारताने मान्य केलेला नाही. वांग यी यांनी पेट्रोलिंग पॉईंटवरून भारतीय सैन्याने माघार घेतल्यास आपणही आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या थोडे मागे घेऊ, अशी तयारी दर्शवली होती. पूर्वानुभव लक्षात घेता भारताने मात्र त्याला नकार दिला.

भारताने हा प्रस्ताव मान्य केला असता तरी चिनी सैन्य मात्र फार थोडे अंतर मागे सरकणार होते. दुसरीकडे भारतीय सैन्याला मात्र बर्‍यापैकी लांब मागे सरकायचे होते. सीमेवरील स्थिती पूर्वपदावर यावी, हीच भारताची एकमेव अट असल्याचे वांग यी यांना यावेळी ठणकावून सांगण्यात आले.

Back to top button