काला जठेडी याची गर्लफ्रेंड लेडी डॉनला दिल्ली पोलिसांकडून अटक - पुढारी

काला जठेडी याची गर्लफ्रेंड लेडी डॉनला दिल्ली पोलिसांकडून अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गँगस्टर काला जठेडी याला अटक करून काही तासही होत नाही तोच कालाची गर्लफ्रेंड व राजस्थानची लेडी डॉन अनुराधा हिला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने शनिवारी अटक केली.

खंडणी, अपहरण आणि हत्येचे अनेक गुन्हे अनुराधाच्या नावावर आहेत. राजस्थान पोलिसांनी तिची माहिती देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

सन २०१७ मध्ये पोलिस इन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या आनंदपाल सिंग याच्या गँगमध्ये अनुराधा कार्यरत होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मनिशी चंद्रा यांनी दिली. अनेक राज्यांना हव्या असलेल्या काला जठेडी याला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथून अटक केली होती.

काला जठेडी याच्यावरही खंडणी, हत्या व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सात लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. जठेडी याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी मोक्का लावला होता. जागतिक किर्तीचा मल्ल सुशीलकुमार याने काही दिवसांपूर्वी पैलवान सागर धनकड याची हत्या केली होती.

त्यावेळी सुशीलकुमारच्या मारहाणीत सोनू नावाचा इसम जखमी झाला होता. सोनू हा जठेडीचा नातेवाईक आहे. सुशीलकुमारने काला जठेडी पासून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

हे ही वाचलं का?

Back to top button