चंदीगडवरून पंजाब आणि हरियाणात टक्‍कर | पुढारी

चंदीगडवरून पंजाब आणि हरियाणात टक्‍कर

चंदीगड ; वृत्तसंस्था : चंदीगड हे शहर पंजाबसह हरियाणाच्या राजधानीचे शहर असले तरी सध्या हे शहर केंद्रशासनाच्या अधिपत्याखाली आहे. तथापि, गेल्या काही दिवसांत या शहरावरून राजकारण तापले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हे शहर पंजाबला द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करत तसा प्रस्ताव पंजाब विधानसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर देखील सरसावले आहेत.

खट्टर यांनी 5 एप्रिल रोजी या मुद्द्यावरून हरियाणा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हरियाणा विधानसभेच्या अधिवेशनातही चंदीगडबाबत प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. राजधानीच्या शहरावरून या घडामोडी घडत असताना दिसत असल्या तरी त्याला आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप अशीही किनार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चंदीगडच्या कर्मचार्‍यांना केंद्राचे नियम लागू करण्याची घोषणा केल्यानंतर चंदीगडवर पंजाबचा पूर्ण अधिकार राहावा, यासाठी पंजाब विधानसभेमध्ये प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे हरियाणातील सर्वच पक्षांनी या प्रस्तावाविरोधात विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात विशेष अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय झाला.

प्रत्येक मुद्द्यावरून चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. एकतर्फी निर्णय घेणे निंदनीय आहे. केजरीवाल आणि मान यांनी हरियाणाची माफी मागितली पाहिजे. अशा निर्णयांना लोकशाहीत काहीही स्थान नाही. चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची संयुक्‍त राजधानी आहे आणि तशीच राहावी. याशिवायही अनेक मुद्दे आहेत त्यावर चर्चा झाली पाहिजे.

– मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा

Back to top button