रेबिज लसीसाठी अख्खं गावच सरकारी रुग्णालयात! | पुढारी

रेबिज लसीसाठी अख्खं गावच सरकारी रुग्णालयात!

ग्वाल्हेर ; वृत्तसंस्था : रेबिजमुळे मृत्यू झालेल्या म्हशीच्या दुधापासून बनलेला पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्यालाही रेबिज झाला की काय, या भीतीपोटी जवळपास अख्खं गावच रेबिजविरोधी लस घेण्यासाठी सरकारी रुग्णालयात पोहोचलं. काहींना लस मिळाली. मात्र ज्यांना मिळाली नाही, त्यांचा पारा चढला. दुधातून वगैरे रेबिज पसरत नाही, अशी समजूत डॉक्टरांनी काढल्यानंतर अखेर गावकरी शांत झाले. हा प्रकार घडला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातल्या चांदपुरा गावात.

तीन दिवसांपूर्वी एका तेराव्याच्या कार्यक्रमात जवळपास सातशे गावकरी जेवले. जेवणाच्या मेनूत रायता होता. ज्या म्हशीच्या दुधापासून हा रायता बनला, तिला रेबिज झालेले कुत्रे चावले होते. त्यात तिच्यासह तिच्या रेडकाचाही मृत्यू झाल्याची बातमी दुसर्‍या दिवशी पसरली.

त्यामुळे जेवलेल्यांची भीतीने गाळण उडाली. सुमारे पाचशे जणांनी थेट सरकारी रुग्णालय गाठत रेबिजविरोधी लस देण्याची मागणी केली. त्यापैकी 25 जणांना ती मिळालीही. मात्र इतकी मोठी संख्या पाहून तेथील डॉक्टरांनी सर्वांना लस देण्यास नकार दिला. त्यानंतर काही गावकर्‍यांनी एसडीएमकडे धाव घेतली.

तेथे ग्वाल्हेरहून तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाला पाचारण करण्यात आले. असा दुधाचा पदार्थ वगैरे खाल्ला तर त्यातून रेबिज होण्याचा धोका नसतो, असे समजावून सांगितल्यानंतर सर्वजण शांत झाले. रविवारी लसीसाठी एकही जण फिरकला नाही. तसेच कोणी आजारी पडल्याची माहितीही समोर आली नाही, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

Back to top button