चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना मोदींनी भेट नाकारली | पुढारी

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना मोदींनी भेट नाकारली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चीनचे परराष्ट्रमंत्री यांग यी 24 मार्च रोजी भारत दौर्‍यावर होते. 25 मार्च रोजी त्यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी, नंतर परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी चर्चा केली. वांग यी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटायचे होते; पण यी यांना त्यासाठी नम्रपणे नकार देण्यात आला.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींना 25 मार्च रोजी उपस्थिती द्यायची होती. दुसरे म्हणजे वांग यी यांचा हा दौराही तसा अघोषित होता. वांग हे 2 वर्षांनंतर नवी दिल्लीत आले होते. चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची त्यांचे समकक्ष भारतीय परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी भेट झालेलीच होती. ही झाली तांत्रिक कारणे, मात्र वांग यी यांना भेट नाकारून एकप्रकारे पंतप्रधान निवासस्थानाने सीमेवरील चीनच्या भूमिकेचा निषेधच नोंदविल्याचे मानले जात आहे.

स्वत: जयशंकर यांनी यासंदर्भात सांगितले की, चीनशी द्विपक्षीय करार नसल्यामुळे आमच्या बाजूने ही भेट जाहीर केली नाही. भारत आणि चीनमधील संबंधही सामान्य नाहीत. सीमेवर परिस्थिती सामान्य होत नाही, तोवर द्विपक्षीय संबंधांत आपण पुढे सरकू शकणार नाही, असे आम्ही वांग यींना स्पष्टच सांगितले आहे.

 

Back to top button