संसद गदारोळ : विरोधी खासदारांच्या वर्तनाने लोकसभा अध्यक्ष व्यथित

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसद गदारोळ : पेगासस हेरगिरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. संसदेच्या उभय सदनांचे कामकाज गुरुवारी पुन्हा बाधित झाले.

विरोधी खासदारांचे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळे आपण व्यथित आहोत, असे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सकाळच्या सत्रात सांगितले.

विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे प्रश्नोत्तर, शून्य प्रहराच्या तासाबरोबरच इतर कामकाजही बाधित झाले. लोकसभेत बुधवारी टी. एन. प्रतापन, हिबी इडन आणि काही अन्य सदस्यांनी राडेबाजी करीत कागदपत्रे फाडून सत्ताधारी बाकांच्या दिशेने फेकली होती.

त्या प्रकाराने आपण व्यथित झालो आहोत, असे ओम बिर्ला यांनी सांगितले.

सदनात आजही कामकाज नाहीच

सदनात आजही कामकाज चालू शकले नाही. प्रश्नोत्तराचा तास सुरु होताच विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष बिर्ला यांना यामुळे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले.

शून्य प्रहरात कामकाज चालू न शकल्याने पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांना कामकाज दुपारी साडे बारापर्यंत तहकूब करावे लागले.

सरकारच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे विरोधी पक्षांना आपली बाजू मांडणे कठीण झाले असल्याचे काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.

दुसरीकडे बेजबाबदारपणाचे वर्तन करूनही विरोधी पक्ष माफी मागत नसल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला.

संसदेत गदारोळ कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाची विधेयके मंजूर करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रल्हाद जोशी विरोधी नेत्यांसोबत चर्चा केली.

तथापि पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदे रद्द करणे, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आदी विषयावर चर्चा घेतल्याशिवाय माघार नाही, असे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना सांगण्यात आले.

विरोधी पक्षांकडून सुरु असलेल्या गदारोळातच केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ‘द इनलँड वेसल्‍स विधेयक सादर केले.

दुसरीकडे हवाई वाहतूक मंत्री ज्‍योतिरादित्‍य शिंदे यांनी एअरपोर्ट् इकनॉमिक रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (सुधारणा) विधेयक सादर केले.

हे ही वाचलं का?

Back to top button