Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ हेच युपीचे मुख्यमंत्री, उद्या शपथविधी | पुढारी

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ हेच युपीचे मुख्यमंत्री, उद्या शपथविधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील भाजप आमदारांच्या बैठकीत आज (दि. २४) योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी औपचारिक निवड करण्यात आली. योगी उद्या, शुक्रवारी (दि. २५) सलग दुसऱ्यांदा यूपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने सलग दुस-यांदा सत्ता मिळवली आहे. जवळपास चार दशकांनंतर एक पक्ष आपला कार्यकाळ पूर्ण करून यूपीमध्ये पुन्हा सत्तेत आला आहे.

आज झालेल्या बैठकीदरम्यान योगी म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रवाद आणि सुशासनाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवता येतात हे भाजपने दाखवून दिले.’

योगी आदित्यनाथ गुरुवारीच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा मांडू शकतात, असे मानले जात आहे. योगी सरकार-२.० चा शपथविधी सोहळा शुक्रवारी एकना स्टेडियमवर दुपारी ४ वाजता होणार आहे. प्रस्तावित कार्यक्रमानुसार, विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर योगी संध्याकाळी राजभवनात पोहोचतील आणि २७३ आमदारांच्या पाठिंब्याने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासमोर सरकार स्थापन करण्याचा दावा करतील.

योगी पुढे म्हणाले की, २०१७ मध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला होता. त्यावेळी मी फक्त खासदार होतो आणि मला प्रशासकीय अनुभव नव्हता. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री माझ्यासाठी मार्गदर्शक होते. त्यांनी मला यूपीसाठी सुशासन कसे करायचे ते सांगितले. खासदार म्हणून तुम्हाला काही गोष्टी माहित असतील पण प्रशासन आणि प्रशासन कसे चालते, ही वेगळी बाब आहे. खासदार होण्यास वाव आहे, परंतु यूपीसारख्या राज्याचा कारभार करणे ही वेगळी गोष्ट आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही यूपीमध्ये सुशासन राबवण्यात यशस्वी ठरलो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवाद आणि सुशासनाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवता येतात हे आम्ही दाखवून दिले आहे.’

यावेळी गृहमंत्री अमित शहा, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी बैठकीला हजेरी लावली. यावेळी नवनिर्वाचित आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय भाजपचा मित्रपक्ष अपना दल आणि निषाद पक्षाचे आमदारही होते. यासोबतच यूपी विधानसभा निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे प्रभारी राधामोहन सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह डॉ. दिनेश शर्मा उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि इतर नेत्यांनी लोकभवनात विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.

Back to top button