अखिलेश यांच्यासाठी मुलायमसिंह मैदानात | पुढारी

अखिलेश यांच्यासाठी मुलायमसिंह मैदानात

मैनपुरी ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघात यंदा काँटे की टक्‍कर होत आहे. येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमोर भाजप नेते, केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचे कडवे आव्हान असणार आहे. दोघांकडून प्रचार जोरात सुरू आहे. गुरुवारी करहल येथे बघेल यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतली, तर अखिलेश यांच्यासाठी मुलायमसिंह यादव प्रचार करण्यासाठी पोहोचले.

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी जवळपास तीन वर्षांनंतर सभेद्वारे मतदारांना संबोधित केले. अखिलेश यांच्यासाठी मतदानाचे आवाहन करत ते म्हणाले की, ‘सपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी, व्यापारी आणि युवकांना मदत केली जाईल. हाच ट्रिपल लेयर फॉर्म्युला देशाला विकासाच्या मार्गावर नेईल’. यावेळी नागरिकांची गर्दी पाहून मुलायमसिंह भावुक झाले. अखिलेश यादव म्हणाले, नेताजींनी करहलमध्ये उपस्थित राहून शोभा वाढवली. त्यांच्या उपस्थितीने विजय नक्‍की झाला आहे, पण सावध राहावे लागेल.

नेताजींचा आशीर्वाद माझ्यासोबत : एसपी सिंह बघेल

मैनपुरी हा मुलायमसिंह यादव यांचा गड मानला जातो. येथून भाजपने एका रणनीतीनुसार केंद्रीय मंत्री बघेल यांना उतरवले आहे. बघेल स्थानिक आहेत. ते मुलायमसिंहांनाच राजकीय गुरू मानतात. बघेल म्हणाले की, ‘ज्याप्रमाणे द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्म पितामह कौरवांसोबत होते, पण त्यांचा आशीर्वाद अर्जुनाला होता, तसेच नेताजी मुलायमसिंह यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे’.

Back to top button