लसीकरण : १८-४४ वयोगटामध्ये उत्तर प्रदेश अव्वल | पुढारी

लसीकरण : १८-४४ वयोगटामध्ये उत्तर प्रदेश अव्वल

नवी दिल्ली ; सुमेध बनसोड : जगातील सर्वाधिक तरुण देश अशी भारताची ओळख आहे. परंतु, कोरोना महारोगराईपासून बचावासाठी राबविण्यात येणार्‍या लसीकरण अभियानांतर्गत तरुणांच्या लसीकरणाचा वेग बराच कमी असल्याचे दिसून आले आहे.

21 जून पासून देशात व्यापक स्तरावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण हाती घेण्यात आले होते. परंतु, गेल्या महिन्याभराहून अधिकच्या काळात केवळ 8.89 टक्के तरुणांचे संपूर्ण लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणांच्या लसीकरणाच्या वेगात महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. भाजपशासित उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश अनुक्रमे पहिल्या तसेच दुसर्‍या क्रमांकावर आहे.

18 ते 44 वयोगटातील लसीकरणाच्या आकडेवारीवर द‍ृष्टिक्षेप टाकला, तर महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर दिसून येईल. राज्यात या वयोगटातील 99 लाख 31 हजार 114 नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, तर 4 लाख 23 हजार 176 तरुणांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

पहिल्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशात 1 कोटी 53 लाख 96 हजार 213 नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. 5 लाख 69 हजार 736 तरुणांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

लसीकरणाच्या यादीत मध्य प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर असून राज्यातील 4 लाख 89 हजार 457 तरुणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. 1 कोटी 12 लाख 86 हजार 804 नागरिकांना पहिला डोस दिला आहे.

महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये सर्वाधिक प्रमाणात तरुणांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत या वयोगटातील 95 लाख 2 हजार 517 नागरिकांना लसीचा किमान एक डोस दिला आहे.

2 लाख 73 हजार 37 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशात आतापर्यंत या वयोगटातील 13 कोटी 4 लाख 46 हजार 413 नागरिकांना लसीचा किमान एक डोस दिला आहे, तर 53 लाख 17 हजार 567 नागरिकांचे संपूर्ण लसीकरण केले आहे. अशातच लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे.

देशात 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्या सुमारे 59.7 कोटी एवढी आहे. परंतु, आतापर्यंत केवळ 5 कोटी 31 लाख 7 हजार 567 नागरिकांचे संपूर्ण लसीकरण केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. अजूनही जवळपास 54 कोटी 39 लाख नागरिकांचे लसीकरण शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत असल्याने लसीकरण मोहीम रेंगाळली आहे. अनेक राज्यांत तरुणांचे लसीकरण मंदावले आहे. दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांना प्राधान्य देत आहेत, हे विशेष!

Back to top button