ममता बॅनर्जी म्हणाल्या बंगाल पार अब दिल्ली दरबार | पुढारी

ममता बॅनर्जी म्हणाल्या बंगाल पार अब दिल्ली दरबार

कोलकाता : पीटीआय : प.बंगालची सत्ता टिकवून ठेवलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता मिशन 2024 वर लक्ष्य केंद्रित केले आहे. देशातून जोपर्यंत भाजप साफ होत नाही तोपर्यंत आपले खेला होबे मिशन देशभर सुरूच राहील,असे पं.बगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले.

दरम्यान, पं.बंगालमध्ये अनेक ठिकाणी ममता यांच्या फोटोसह बंगाल पार अब दिल्ली दरबार असे स्लोगन असलेले पोस्टर सर्वत्र झळकले आहेत.

उत्तर प्रदेश, गुजरात आणि दिल्ली येथे त्यांनी व्हर्च्युअल रॅली घेतली. यावेळी त्यांनी आपला हा इरादा स्पष्ट केला. 16 ऑगस्टपासून दिल्लीच्या सत्तेला धडक देण्यासाठी मोहीम सुरू होईल. या दिवशी गरीब मुलांना फुटबॉलचे वाटप केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आज देशाचे स्वातंत्र्य भाजपमुळे धोक्यात आले आहे.

स्वत:च्याच मंत्र्यांवर त्यांचा भरवसा नाही. केंद्रीय एजन्सीजचा त्यांच्याकडून दुरुपयोग सुरू आहे. आमचे फोन टॅप होऊ लागले आहेत. पेगासस हा त्याचाच खतरनाक आणि क्रूर चेहरा आहे. सध्या मी फोनवरून कोणाशी फार काही बोलू शकत नाही.

विरोधी नेत्यांच्या टेहळणीवर हे लोक खूप पैसे ख़र्च करू लागले आहेत. मी माझ्या फोनला प्लास्टर लावला आहे. याचप्रमाणे लवकरच आपल्याला सध्याच्या केंद्र सरकारवरही प्लास्टर चढवावा लागेल, असे ममता यांनी या व्हर्च्युअल सभेत सांगितले.

तृणमूल राष्ट्रीय राजकारणात

ममता बॅनर्जी यांनी बुधवारच्या रॅलीद्वारे पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची अप्रत्यक्ष घोषणाच केली आहे. त्यांचे आजचे भाषण ऐकविण्यासाठी त्रिपुरा, आसाम, ओडिशा, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे मोठमोठे स्क्रीन लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी ममता यांच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेत अनुवादही केला जात होता.

Back to top button