‘जैश-ए-मोहम्मद’ च्या 2 कमांडर्ससह 5 जणांचा काश्मीरमध्ये खात्मा | पुढारी

‘जैश-ए-मोहम्मद’ च्या 2 कमांडर्ससह 5 जणांचा काश्मीरमध्ये खात्मा

जम्मू ; अनिल साक्षी : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’ च्या दोघा कमांडर्ससह 5 दहशतवादी रविवारी मारले गेले. मृतांमध्ये एका पाकिस्तानी तसेच ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्याचाही समावेश आहे.

‘जैश-ए-मोहम्मद’ च्या मृत कमांडरचे नाव जाहिद वाणी आहे. प्राप्‍त माहितीनुसार, सुरक्षा दलांना रात्री पुलवामा जिल्ह्यातील नायरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी या परिसराची नाकाबंदी केली. नाकाबंदीनंतर चकमक उडाली. पोलीस, लष्कर आणि ‘सीआरपीएफ’च्या संयुक्‍त पथकाने ही मोहीम राबविली.

मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्‍त करण्यात आली. खात्मा झालेल्या कमांडर जाहिद वाणीचा 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते.

दुसरी चकमक बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ येथे झाली. येथेही पोलीस आणि ‘सीआरपीएफ’ने मिळून मोहीम राबविली. या कारवाईत सुरक्षा दलांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून एके-56 रायफलींसह अनेक शस्त्रे जप्‍त केली आहेत.

अली मोहम्मद यांचे बलिदान

अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागातील हसनपोरा येथे दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांची गोळ्या झाडून हत्या केली. अली मोहम्मद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला होता आणि शहीद अली मोहम्मद यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, लवकरच दोषींना शिक्षा होईल, असे सांगितले होते. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली.

जानेवारीत 22 दहशतवाद्यांचा खात्मा

नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात काश्मीरमध्ये 11 चकमकी झाल्या. पाकिस्तानातील 8 कट्टरपंथीयांसह 22 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

* पुलवामा, चरार-ए-शरीफ येथे चकमकी
* मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा पुलवामा येथील हल्ल्यात हात

Back to top button