कोरोना संसर्ग झालेल्यांना तीन महिन्यांपर्यंत लस नाही | पुढारी

कोरोना संसर्ग झालेल्यांना तीन महिन्यांपर्यंत लस नाही

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांना आता बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लस देण्यात येईल. यामध्ये बूस्टर डोसचाही समावेश असेल, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या अप्पर सचिव विकास शील यांनी राज्यांना पत्र पाठवून यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना खबरदारी म्हणून बूस्टर डोस देण्यात येत आहे. 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांनाही लसीकरणाचे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येत आहे. परंतु, राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीनुसार आता कोरोना झालेल्या व्यक्‍तीचे लसीकरण किंवा बूस्टर डोस पुढे ढकलण्यात येणार आहे.

12 वर्षे वयोगटाचे लसीकरण फेब्रुवारीअखेर

दरम्यान, 12 ते 14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोरोना कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली. 15 ते 17 वयोगटातील सर्व 7.4 कोटी किशोरवयीन मुलांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. फेब्रुवारीअखेरीस दुसरा डोस पूर्ण होईल. त्यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून लसीकरण सुरू होईल, असे संकेत अरोरा यांनी दिले.

Back to top button