पंतप्रधान नरेंद्र मोदी : स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षांनी देखील अनेक जिल्हे मागास! | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी : स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षांनी देखील अनेक जिल्हे मागास!

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : अर्थसंकल्पात वाढ होत गेली, योजना बनत राहिल्या, विकास आकड्यांमध्ये होत राहिला. मात्र, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनेक जिल्हे मागासच राहिले आहेत. कालांतराने या जिल्ह्यांना मागास जिल्ह्यांचा ‘टॅग’ लावण्यात आला, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्‍त केली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशातील जिल्हाधिकार्‍यांना संबोधित केले.

विकासासाठी प्रशासन आणि जनतेदरम्यान थेट संवाद आणि एक भावनिक बंध आवश्यक आहे. एक प्रकारे प्रशासनाचे ‘टॉप टू बॉटम’ आणि ‘बॉटम टू टॉप’ प्रवाह आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सरकारच्या वतीने आकांक्षी जिल्ह्यांत जी कामे झाली आहेत, तो विद्यापीठांसाठी अध्ययनाचा विषय ठरू शकतो. गेल्या चार वर्षांत देशातील जवळपास सर्वच आकांक्षी जिल्ह्यांमध्ये जन-धन खात्यांमध्ये 4 ते 5 पटीने वाढ झाली आहे. जवळपास प्रत्येक कुटुंबांना शौचालयासाठी निधी देण्यात आला आहे. प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचली आहे. ज्या एक-दोन मापदंडांवर 142 जिल्हे मागास आहेत, तेथे सामूहिक काम करण्याची गरज पंतप्रधानांनी बोलून दाखवली.

डिजिटल इंडियाच्या रूपात देश एका मौन क्रांतीचा साक्षीदार बनत आहे. देशातील कुठलाही जिल्हा यात मागे राहणार नाही. गावोगावी ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर’ सेवा आणि सुविधांचे डोअर स्टेप डिलिव्हरीचे माध्यम बनावे, ही महत्त्वाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Back to top button