मुख्यमंत्री धामी खाटिमातून लढणार | पुढारी

मुख्यमंत्री धामी खाटिमातून लढणार

देहराडून ः अभिमन्यू कुमार

उत्तराखंडमध्ये भाजपने अपेक्षेनुसार खाटिमा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांना तिकीट दिले. तर प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक हे हरिद्वारमधून नशीब आजमावणार आहेत. भाजपने 70 पैकी 59 जागांवरचे उमेदवार घोषित केले आहेत. 59 उमेदवारांमध्ये 15 ब्राम्हण आहेत तर 3 बनिया आहेत.

सतपाल महाराज यांच्यासह चार अध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांचा यादीत समावेश आहे. सतपाल महाराज यांना चौबट्टाखालमधून उमेदवारी दिली आहे. उत्तराखंड महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपवासी झालेल्या सरिता आर्या यांना नैनीतालमधून संधी दिली आहे.

सल्ट मतदारसंघात 2017 मध्ये सुरेंद्रसिंह जीना विजयी झाले होते. या जागेवर त्यांचे बंधू महेश जीना यांना संधी दिली आहे. पिथौरागडमध्ये चंद्रा पंत यांची लॉटरी लागली आहे. माजी मंत्री प्रकाश पंत यांच्या त्या पत्नी आहेत. डेहराडून कॅन्ट या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात सविता कपूर यांना संधी मिळाली आहे. माजी आमदार स्व. हरबंस कपूर यांच्या त्या पत्नी आहेत. माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र सौरभ यांना सीतारगंजमधून तर काशीपूरमधून त्रिलोकसिंह चीमा यांना तिकीट मिळाले आहे.

चौघांचे तिकीट कापले

भाजपने ज्या प्रमुख नेत्यांचे तिकीट कापले आहे, त्यात माजी मुख्यमंत्री बी. सी. खंडूरी यांची मुलगी ऋतू यांचा समावेश आहे. त्या यमकेश्‍वरच्या आमदार होत्या. या ठिकाणी रेणू बिष्ट यांना तिकीट दिले आहे. खानपूमधून कुंवर प्रणव चॅम्पियन यांच्या जागी त्यांच्या पत्नी कुंवर राणी देवयानी यांना उमेदवारी दिली आहे. अल्मोडामधून रघुनाथसिंह चौहान यांच्या जागी कैलाश शर्मा नशीब आजमावतील. महिला अत्याचाराचा आरोप झालेल्या महेश नेगी यांना द्वाराहाटमधून तिकीट नाकारले असून काही तासांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या दुर्गेश्‍वर लाल यांना पुरोलामध्ये तिकीट दिले आहे.

Back to top button