कोरोना : चिंता वाढवणार्‍या १० राज्यांत महाराष्ट्र - पुढारी

कोरोना : चिंता वाढवणार्‍या १० राज्यांत महाराष्ट्र

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या तुलनेत देशात मृत्युदराचे प्रमाण बर्‍याचअंशी कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, चिंता वाढवणार्‍या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

13 जानेवारीला संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत 20 जानेवारीला संपलेल्या आठवड्याचा म्हणजेच साप्‍ताहिक संसर्ग दर महाराष्ट्रात 20.35 टक्क्यांवरून 22.12 टक्के वाढला. दिल्‍लीचा ताजा साप्‍ताहिक संसर्ग दर तब्बल 30.53 टक्के आहे, तर केरळचा 32.34 टक्के आहे.

भूषण म्हणाले, भारतातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान या 10 राज्यांत सर्वाधिक सक्रिय बाधित आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये या राज्यांमध्ये तपासण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.

भूषण म्हणाले, दुसर्‍या लाटेदरम्यान केवळ 2 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले होेते. तिसर्‍या लाटेदरम्यान हे प्रमाण 72 टक्के आहे. 1 जानेवारी 2022 रोजी असलेला देशाचा कोरोना संसर्ग दर 2 टक्क्यांवरून 16 टक्क्यांपर्यंत पोहोचला. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेदरम्यान सौम्य लक्षणांसह पाच दिवसांमध्ये रुग्ण बरे होत असल्याचे दिसून येत आहे. 11 ते 18 वर्षांतील मुलांमध्ये ताप सर्वसामान्य आहे.

परंतु, संसर्ग फुप्फुसामध्ये पोहचत नसल्याचेही भूषण यांनी स्पष्ट केले. 15 ते 18 वयोगटातील 52 टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्यात आला आहे. देशातील 6.5 कोटी लोकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.

Back to top button