देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत २ लाख ८२ हजार नवे रुग्ण, ४४१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ८२ हजार ९७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४१ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत गेल्या २४ तासांत ४४,८८९ रुग्ण अधिक आढळून आले आहेत. देशात सध्या कोरोनाचे १८ लाख ३१ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण ८,९६१ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळून आले आहेत.

याआधी देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली होती. सोमवारी दिवसभरात २ लाख ३८ हजार १८ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३१० रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान १ लाख ५७ हजार ४२१ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९४.०९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २० हजार ७१ ने घट दिसून आली.

दरम्यान, देशातील ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ८.३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.

मुंबई पोलिसातील आणखी २८ कर्मचारी बाधित…

गेल्या २४ तासांत मुंबई पोलिसांतील आणखी २८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,२७३ झाली आहे.

पुण्यातील ५०४ पोलिसांना कोरोनाची लागण…

पुणे पोलिस दलातील आणखी २१ जणांना काल कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यामुळे शहरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ५०४ झाली आहे. याबाबतची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

८४ आयएएस अधिकारी पॉझिटिव्ह…

उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. उत्तराखंडमधील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमधील आयएएस अधिकारी आणि कर्मचारी मिळून ८४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

देशातील १५ ते १८ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक तरुणांना #COVID19 लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

हॉटस्पॉट, जास्त घनतेच्या भागातील चाचण्या वाढवण्याचे निर्देश

कोरोना हॉटस्पॉट तसेच लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागातील चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे पत्र केंद्राने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या घ्याव्यात, असेही सरकारने म्हटले आहे.

जर्मनीत कोरोना वाढला…

जर्मनीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. जर्मनीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १ लाख रुग्ण आढळून आले आहेत.

Exit mobile version