स्मृती इराणींकडून कॉंग्रेसवर हल्लाबोल सुरुच | पुढारी

स्मृती इराणींकडून कॉंग्रेसवर हल्लाबोल सुरुच

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

पंजाबमधे पंतप्रधानांच्या सुरक्षेवरुन उठलेले वादंग शांत होण्याची शक्यता सध्या कमीच आहे. पंजाबच्या फिरोजपूरमधे घडलेल्या या प्रकरणावरुन भाजप नेत्या स्मृती इराणींनी बुधवारी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेस सरकारवर घणाघाती टीका केली.

स्मृती इराणी यांनी पंतप्रधानांची सुरक्षा भेदली गेल्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वासमोर काही प्रश्न उपस्थित केले होते. एका दूरदर्शन वाहिनीने त्या प्रश्नांचे गंभीर परिणाम देशासमोर आणले. राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर पंजाब पोलिसांनी केलेली वक्तव्ये खरी परिस्थिती दर्शविणारी होती. याच पार्श्वभूमीवर स्मृती इराणींनी “तुम्ही नेमके कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे ? असा प्रश्न पंजाब पोलिसांना विचारला.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, “डीजीपींनी पूर्ण व्यवस्था आणि मार्ग सुरक्षित असल्याचा संदेश पंतप्रधानांच्या सुरक्षा टीमला का दिला? सतर्कतेचा आदेश मिळाल्यानंतरही वाढीव सुरक्षा पुरवण्यात दिरंगाई करणारा कॉंग्रेस सरकारचा अधिकारी कोण आहे? पंजाबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा ताफा थांबवायचा आदेश कॉंग्रेस सरकारच्या कोणत्या नेत्याने दिले होते? कॉंग्रेसचे नेते या परिस्थिती गांभीर्य हास्यास्पद रितीने कमी करत आहेत, हे फारच दुर्दैवी आहे.”

“पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार प्रयत्न करूनही कॉंग्रेस नेतृत्वाने मुद्दाम पंतप्रधानांना असुरक्षित वातावरणात ठेवलं. हे फक्त निंदनीयच नव्हे तर दंडनीय कृत्य आहे”, असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा :

व्हिडीओ पहा : व्हिडिओ व्हायरल! माकडाच्या मृत्यूनंतर मुंडन अन्‌ तेराव्याला भोजन, १५०० लोकांची गर्दी

Back to top button