लष्करी जवानांच्या गणवेशात बदल | पुढारी

लष्करी जवानांच्या गणवेशात बदल

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश लवकरच बदलणार आहे. ‘आर्मी परेड डे’दरम्यान 15 जानेवारी रोजी जवान पहिल्यांदा या नव्या गणवेशात बघायला मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत भारतीय लष्कर आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ने संयुक्‍तपणे गणवेशाचे डिझाईन केले आहे.

जवानांची तैनाती असलेले विविध भूभाग डोळ्यांसमोर ठेवून गणवेश साकारला गेला आहे. सैनिकांना आरामदायक वाटेल, याची काळजी घेण्यात आली आहे.

कसे असेल नवीन कापड?

देशांतर्गत तसेच सीमाभागांतील त्या-त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार भारतीय जवानांच्या गणवेशाचे कापड ठरविण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना आहे.

निवडण्यात येणारे नवे कापड हे टेरिकॉटचे नसेल. अधिक मजबूत आणि वजनाने हलक्या कापडाला प्राधान्य असेल. कापडाच्या रंगात आमूलाग्र बदल मात्र केला जाणार नाही.

आतापर्यंत तीन वेळा बदल

1947 स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय जवानांचा गणवेश पाकिस्तानी सैन्यापेक्षा वेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले होतेे.

1980 नव्याने बदललेल्या या गणवेशास ‘बॅटल ड्रेस’ हे नाव देण्यात आले आहे.

2005 सरकारने ‘सीआरपीएफ’ आणि ‘बीएसएफ’च्या युनिफॉर्म वेगळे दिसावेत म्हणून जवानांच्या गणवेशात बदल केला होता.

Back to top button